भारताबरोबर दुबई येथे डिसेंबर महिन्यात क्रिकेट मालिका होण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळ आशावादी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निमंत्रणामुळे पाकिस्तानचे पदाधिकारी भारतात आले होते, मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविल्यामुळे या पदाधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागले होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी समितीचे प्रमुख नजाम सेठी यांनी सांगितले, उभय देशांमध्ये क्रिकेट सामने आयोजित केले जावेत अशी भारतीय क्रिकेट संघटकांचीही इच्छा आहे. त्यामुळेच त्यांनी आम्हाला भारतात निमंत्रित केले होते. त्यांची इच्छाच नसती तर त्यांनी आम्हाला निमंत्रण पाठविले नसते. आम्हाला भारतात खूपच कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. हे लक्षात घेता लवकरच उभय देशांमध्ये क्रिकेट सामने सुरू होतील अशी आम्हाला खात्री आहे.