शुक्ला यांचा निर्वाळा
संयुक्त अरब अमिरातीमध्ये मालिका खेळण्याऐवजी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) देशात क्रिकेटसाठी सुरक्षित ठिकाणे विकसित करावी. तसे केल्यास आम्हाला लाहोरमध्ये खेळण्यास कोणतीही हरकत नसेल, असा निर्वाळा आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी दिला आहे.
‘‘पाकिस्तान सातत्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळत आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटची अपरिमित हानी होत आहे. लाहोर क्रिकेटसाठी अनुकूल ठिकाण करता येऊ शकते. पीसीबीने लाहोरच्या स्टेडियमजवळ संघांच्या निवासासाठी हॉटेलची व्यवस्था करावी, तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवावी. हे जर पीसीबीने केल्यास आम्हाला लाहोरमध्ये खेळता येईल,’’ असे मत शुक्ला यांनी व्यक्त केले आहे.
‘‘पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सुरक्षेची योग्य हमी दिल्यास भारताला किंवा अन्य देशांना लाहोरमध्ये खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही,’’ असे त्यांनी सांगितले.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या क्रिकेट संघटनांमध्ये गेल्या वर्षी सामंजस्य करार झाला होता. मात्र त्या वेळी आयसीसी आणि बीसीसीआयचे प्रमुख पद अन्य व्यक्तीकडे होते, असे शुक्ला यांनी सांगितले.
‘‘सध्याच्या बीसीसीआयच्या अध्यक्षांना भारत-पाकिस्तान मालिका पुन्हा सुरू व्हाव्यात, परंतु ते सामने त्यांच्या देशात व्हावेत असे वाटते. त्यामुळेच भारतात या आणि मालिका खेळा, असे निमंत्रण आम्ही दिले आहे. याचप्रमाणे आम्ही नुकसानभरपाईसुद्धा करायला तयार आहोत. पाकिस्तानमधील वातावरण अनुकूल होईल, तेव्हा भारतसुद्धा तिथे जाऊन खेळू शकेल,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.

सामंजस्य कराराचे बीसीसीआयवर दडपण
पीसीबीशी केलेल्या सामंजस्य कराराचे पालन करण्याचे दडपण बीसीसीआयवर आहे. नजम सेठी पीसीबीचे कार्याध्यक्ष असताना गेल्या वर्षी दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानुसार २०१५ ते २०२३ या कालखंडात दोन देशांमध्ये सहा क्रिकेट मालिका खेळवण्यात याव्यात, असे नमूद केले आहे.