तब्बल २० वर्षांनंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर क्रिकेट कसोटी मालिकेत विजय मिळवण्याची किमया साधली. ऑस्ट्रेलियाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये चारी मुंडय़ा चीत करत २-० असा दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला तब्बल ३५६ धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही डावांत शतक झळकावणाऱ्या मिसबाह-उल-हकला सामनावीराचा, तर दोन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावणाऱ्या युनूस खानला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
४ बाद १४३ धावांवरून पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. स्टिव्हन स्मिथने १२ चौकारांच्या जोरावर ९७ धावांची खेळी साकारत संघाला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामध्ये तो अपयशी ठरला. स्मिथ बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे टिकाव धरता आला नाही. पाकिस्तानकडून झुल्फिकार बाबरने पाच विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान (पहिला डाव) : ६ बाद ५७० (डाव घोषित)
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : २६१
पाकिस्तान (दुसरा डाव) : ३ बाद २९३ (डाव घोषित)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ८८.३ षटकांत सर्व बाद २४६
(स्टिव्हन स्मिथ ९७; झुल्फिकार बाबर ५/१२०, यासिर शाह ३/४४).
सामनावीर : मिसबाह-उल-हक.
मालिकावीर : युनूस खान.