श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या ३८२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने ३ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करून तिसऱ्या कसोटीसह तीन कसोटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.  शान मसूद (१२५) आणि युनूस खान (नाबाद १७१) यांच्या झंझावाती शतकांच्या जोरावर पाकिस्तानने २ बाद १३ धावा अशा दयनीय अवस्थेतून संघाला सावरत ७ विकेट्सने विजय मिळवून दिला. युनूस खानला सामनावीर म्हणून, तर यासीर शाहला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : (पहिला डाव) २७८ व (दुसरा डाव) ३१३ पराभूत वि. पाकिस्तान : (पहिला डाव) २१५ व (दुसरा डाव) ३ बाद ३८२ (शान मसूद १२५, युनूस खान नाबाद १७१, मिसबाह उल हक नाबाद ५९).
कसोटी क्रमवारीत पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर
दुबई : धावांचा पाठलाग करून श्रीलंकेवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयासह मालिका जिंकण्याची किमया साधणाऱ्या पाकिस्तानने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारत आणि न्यूझीलंडला मागे टाकून तिसरा क्रमांक काबीज केला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्यापाठोपाठ तिसरे स्थान मिळवले. न्यूझीलंड आणि भारत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. श्रीलंकेने मालिका गमावल्यामुळे चार गुण गमावले आहेत. त्यांच्या खात्यावर आता ९२ गुण असून, त्यांनी आपले सातवे स्थान मात्र कायम राखले आहे.