इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या पावलांवर पाऊल टाकत प्रो-कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामात फ्रेंचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना प्रवेशबंदी केली आहे. सोमवारी झालेल्या परदेशी खेळाडूंच्या लिलावामध्ये नासिर अली, वासिम सज्जड, हसन रझा यांच्यासह ब आणि क विभागातील सर्वच खेळाडूंना संघमालकांनी प्रकर्षांने टाळले आहे.

प्रो-कबड्डीच्या पहिल्या लिलावात पाकिस्तानी खेळाडूंची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिसऱ्या हंगामात निवड झालेले पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊच शकले नव्हते. चौथ्या हंगामातही त्यांचा सहभाग नव्हता. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रीडासंबंध संपुष्टात आले असताना प्रो-कबड्डीच्या लिलावात १० पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केल्यामुळे सर्वानीच आश्चर्य प्रकट केले होते. पाकिस्तानकडून दहशतवादाला पाठबळ देण्याचे कार्य थांबणार नाही, तोवर त्यांच्याशी क्रीडासंबंध प्रस्थापित होणे कठीण आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना प्रो-कबड्डीमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते

‘‘प्रो-कबड्डीचे संयोजक पाकिस्तानी खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतील. मात्र त्यांच्या खेळण्याबाबतचा निर्णय भारत सरकार घेईल. पाकिस्तानकडून जोवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे कार्य थांबत नाही, तोवर त्यांच्यासोबत खेळणे कठीण आहे,’’ असे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी स्पष्ट केले.

‘‘पाकिस्तानी खेळाडूंची निवड झाल्यावर त्यांच्या व्हिसाबाबतचा निर्णय क्रीडा मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे निवड झाली असती आणि काही कारणास्तव खेळू शकले नसते, तर आम्ही पर्यायी परदेशी खेळाडू त्यांना उपलब्ध केला असता,’’ असे संयोजकांनी सांगितले.