रोमहर्षक लढतीत भारत विजयी;  मनीष पांडेचे नाबाद शतक; रोहित शर्माला मालिकावीराचा पुरस्कार

अखेर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताला विजयाचे सूर्यदर्शन घडले. शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात मनीष पांडेच्या नाबाद शतकी खेळीने भारताला तारले. भारताने दोन चेंडू आणि सहा विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि एकदिवसीय मालिकेचा शेवट गोड केला. परंतु धावांची बरसात पाहायला मिळालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर मात्र ऑस्ट्रेलियाने ४-१ असा कब्जा केला.

विजयासाठी ३३१ धावांचे आव्हान भारताने पांडेच्या १०४ धावांच्या खेळीमुळे पेलले. त्याआधी रोहित शर्मा (९९) आणि शिखर धवन (७८) यांनी १२३ धावांची सलामी नोंदवून विजयाचा पाया रचला. भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्वाधिक धावांचा पाठलाग करून विजय नोंदवला.

अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता असताना ऑस्ट्रेलिया पाचव्या सामन्यासह मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवणार असेच चित्र दिसत होते. मात्र मिचेल मार्शचा पहिलाच चेंडू वाइड पडला आणि त्याने आत्मविश्वास गमावला. दडपण झुगारण्यात वाकबगार असलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुढच्या फुलटॉस चेंडूवर लाँग ऑफला षटकार खेचला. सामन्याचे पारडे दोलायमान स्थितीत होते. मग दुसऱ्या चेंडूवर पुन्हा उत्तुंग फटका खेळण्याचा धोनीचा प्रयत्न फसला आणि चेंडू लाँग ऑफला डेव्हिड वॉर्नरच्या हातात विसावला. स्ट्राइकवर आलेल्या पांडेने उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूला थर्ड मॅनच्या सीमारेषेबाहेर धाडून आपल्या कारकीर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावले. त्यानंतर सर्व क्षेत्ररक्षक आतील वर्तुळात आणण्यात आले. ३ चेंडूंत २ धावा इतके समीकरण सोपे झाले होते. चौथ्या चेंडूवर पांडेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दोन धावा काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि उपकर्णधार विराट कोहलीने त्याचे अभिनंदन करण्यासाठी मैदानावर धाव घेतली.

पांडेने सामनावीर आणि पाच सामन्यांत ११०.२५च्या सरासरीने ४४१ धावा काढणाऱ्या रोहित शर्माने मालिकावीर पुरस्कार पटकावला. रोहितने या सामन्यात पाच हजार एकदिवसीय धावांचा टप्पा ओलांडला. मात्र मालिकेतील तिसरे शतक नोंदवण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. धोनीने या सामन्यात ४२ धावांत ३२ धावा केल्या. सुरुवातीला धावांसाठी झगडणाऱ्या धोनीने अखेरच्या षटकात मात्र षटकार ठोकून ‘द ग्रेट फिनिशर’ हे बिरुद साध्य ठरवले.

त्याआधी, ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नरचे पाचवे (१२२) आणि मिचेल मार्शच्या (१०२*) पहिल्यावहिल्या शतकाच्या बळावर ७ बाद ३३० धावा केल्या. वॉर्नर आणि मार्श यांनी पाचव्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले.

भारताविरुद्ध पहिल्या शतकाची परंपरा

एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक भारताविरुद्ध झळकावण्याची वडिलोपार्जित परंपरा मिचेल मार्शनेसुद्धा जोपासली. वडील जेफ मार्श आणि भाऊ शॉन मार्श या दोघांनीही आपले पहिले शतक भारताविरुद्धच झळकावले होते. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत मिचेलने शनिवारी हा पराक्रम केला.

धावफलक

ऑस्ट्रेलिया : आरोन फिन्च पायचीत गो. इशांत ६, डेव्हिड वॉर्नर झे. जडेजा गो. इशांत १२२, स्टीव्ह स्मिथ झे. रोहित गो. बुमराह २८, जॉर्ज बेली झे. इशांत गो. रिशी ६, शॉन मार्श धावचीत ७, मिचेल मार्श नाबाद १०२, मॅथ्यू वेड झे. धोनी गो. यादव ३६, जेम्स फॉकनर त्रि. गो. बुमराह १, जॉन हॅस्टिंग्ज नाबाद २, अवांतर (बाइज ४, लेगबाइज ७, वाइड ८, नोबॉल १) २०, एकूण ५० षटकांत ७ बाद ३३०.

बाद क्रम : १-६, २-६४, ३-७८, ४-११७, ५-२३५, ६-३२०, ७-३२३.

गोलंदाजी : इशांत शर्मा १०-०-६०-२, उमेश यादव ८-०-८२-१, जसप्रीत बुमराह १०-०-४०-२, रिशी धवन १०-०-७४-१, रवींद्र जडेजा १०-०-४६-०, गुरकीरत सिंग २-०-१७-०

भारत : रोहित शर्मा झे. वेड गो. हेस्टिंग्ज ९९, शिखर धवन झे. शॉन गो. हॅस्टिंग्ज ७८, विराट कोहली झे. वेड गो. हॅस्टिंग्ज ८, मनीष पांडे नाबाद १०४, महेंद्रसिंग धोनी झे. वॉर्नर गो. मिचेल ३४, गुरकीरत सिंग नाबाद ०, अवांतर (लेगबाइज ३, वाइड ५) ८, एकूण ४९.४ षटकांत ४ बाद ३३१.

बाद क्रम : १-१२३, २-१३४, ३-२३१, ४-३२५.

गोलंदाजी : जॉन हॅस्टिंग्ज १०-१-६१-३, स्कॉट बोलँड १०-०-५८-०, मिचेल मार्श ९.४-०-७७-१, जेम्स फॉकनर १०-०-५४-०, नॅथन लिऑन ८-०-५८-०, स्टीव्हन स्मिथ २-०-२०-०.

सामनावीर : मनीष पांडे,  मालिकावीर : रोहित शर्मा.मालिकेत आम्ही तोलामोलाची लढत दिली असे मला वाटते. सामने जिंकणे, हे लक्ष्य होते. पहिले चार सामने अटीतटीचे झाले, मात्र विजय मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो. एकदिवसीय क्रिकेट प्रकारात विशेषत: मोठय़ा धावसंख्येच्या सामन्यात प्रत्येक षटकाचे महत्त्व असते. एखाद्या षटकात १५-२० धावा दिल्या गेल्यास प्रतिस्पर्धी संघाला विजयाचा मार्ग सुकर होतो.

महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे खेळू न शकल्यामुळे मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. प्रत्येक सामन्यात तीनशेहून अधिक धावसंख्या होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर मी या संधीचे सोने केले. स्टेडियममध्ये अनेक भारतीय क्रिकेटरसिकांची उपस्थिती आणि त्यांचा जल्लोश आत्मविश्वास वाढवणारा होता.

मनीष पांडे, भारताचा फलंदाज

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत मोठय़ा धावसंख्यांचा महोत्सव सुरू आहे. या मालिकेतील खेळाडूंचा खेळ हा अतिशय अभिमानास्पद होता. अखेरच्या सामन्यात भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला. आम्ही क्षेत्ररक्षण करताना अनेक महत्त्वाच्या संधी दवडल्या. परंतु क्रिकेटमध्ये असे घडत असते. पुढील यशस्वी वाटचाल करण्यासाठी यात सुधारणा करणे आवश्यक आहे.

स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार