भारताच्या पारुपल्ली कश्यपने दीड तासांच्या कडव्या संघर्षांनंतर चीनी तैपेइच्या जेन हाओ हिसूवर विजय मिळवत आशियाई बॅडमिंटन स्पध्रेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुखापतीतून सावरणाऱ्या पी. व्ही. सिंधूनेही सकारात्मक सुरुवात करत आगेकूच केली.
बॅडमिंटन कारकीर्दीतील कश्यपची ही दीर्घकाळ चाललेली लढत ठरली. पहिला गेम गमावल्यानंतर कश्यपने दमदार पुनरागमन केले आणि जेनचा १५-२१, २१-१८, २१-१९ असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पध्रेतील विजेत्या कश्यपला पुढील फेरीत सातव्या मानांकित चीनच्या झेंगमिंग वांगशी सामना करावा लागेल. वांगने थायलंडच्या बुनसॅक पोन्सानाचा २१-१०, २१-१२ असा सहज पराभव केला. बुधवारी झालेल्या या सामन्यात निर्णायक गेम दरम्यान वीज गेल्यामुळे सामना १० ते १५ मिनिटे थांबविण्यात आला. या गेममध्ये कश्यपने २०-१९ अशी आघाडी घेतली होती आणि वीज आल्यानंतर कश्यपने जराही वेळ न दवडता बाजी मारली.
याआधी कश्यपला वांगकडून तीनवेळा पराभव पत्करावा लागला आहे, तर २०१४च्या भारतीय सुपर सीरिज स्पध्रेत कश्यपने बाजी मारली होती.  
महिला गटात विश्व अजिंक्यपद स्पध्रेत दोन वेळा कांस्यपदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूने दुखापतीनंतर खेळताना सकारात्मक सुरुवात केली.  तिने उजबेकिस्तानच्या अनैत खुर्शुज्ञानचा २१-६, २१-५ असा धुव्वा उडवत तिसरी फेरी गाठली. पुढील लढतीत तिला मकाऊच्या तेंग लोक यू हिचा सामना करावा लागेल. पुरुष दुहेरीत अक्षय देवळकर आणि प्रणव जेरी चोप्रा यांना दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले.
या भारतीय जोडीला जपानच्या चौथ्या मानांकित हिरोयुकी एंडो व केनिची हायकावा या जोडीकडून १५-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, मनु अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी या जोडीला पुढे चाल मिळाल्याने तिसऱ्या फेरीत प्रवेश करता आले.  

ही लढत आव्हानात्मक होती आणि दीर्घकाळ चालली. मात्र, निकालाने मी आनंदित आहे. याआधी गतवर्षी आशियाई बॅडमिंटन स्पध्रेत त्याने मला पराभूत केले होते. भारतीय खुल्या स्पध्रेतही त्याने कडवे आव्हान दिले होते. आशा करतो की पुढील फेरीत कामगिरीत आणखी सुधारणा करण्यात यश मिळेल.
– पारुपल्ली कश्यप