लंडन ऑलिम्पिकमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या पारुपल्ली कश्यपने चीन सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. निग्रहाने खेळ करताना कश्यपने व्हिएतनामच्या सातव्या मानांकित तिअेन मिन्ह ग्युयेनवर १२-२१, २२-२०, २१-१४ अशी मात केली.
पहिला गेम गमावल्यानंतर कश्यपवर दडपण वाढले होते. त्यातच दुसऱ्या गेममध्येही तो १-५ने पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर सलग सात गुणांची कमाई करत कश्यपने पाच गुणांची आघाडी घेतली, मात्र त्यानंतर तिअेनने १७-१७ अशी बरोबरी केली. यानंतर चुरशीच्या मुकाबल्यामुळे २०-२० अशी बरोबरी झाली, मात्र यानंतर कश्यपने झटपट दोन गुण मिळवत गेम जिंकला आणि आव्हान जिवंत राखले.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये कश्यपने ११-८ अशी आघाडी घेतली, मात्र त्यानंतर तिअेनने जोरदार टक्कर देत कश्यपला गुणांसाठी झगडायला लावले, मात्र कश्यपने संयमाने खेळ करत तिसऱ्या गेमसह विजय मिळवला.
अन्य लढतींमध्ये प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी तसेच तरुण कोना आणि अरुण विष्णू या दोन्ही जोडय़ांना पराभवाला सामोरे जावे लागले.