अमेरिकन खुली बॅडमिंटन : कश्यप-प्रणॉय यांच्यात अंतिम सामना

जागतिक बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष खेळाडूंची घोडदौड वेगाने सुरू आहे. राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांच्यात अमेरिकन खुल्या ग्रॅण्ड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे.

ऑक्टोबर २०१५मध्ये पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावे लागलेल्या कश्यपने तब्बल २१ महिन्यांनंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. गतवर्षी स्विस खुली स्पर्धा जिंकण्याची किमया साधणाऱ्या आणि दुखापतींशी झुंजणाऱ्या प्रणॉयशी त्याला सामना करायचा आहे.

कश्यपने संघर्षपूर्ण कामगिरी करीत कोरियाच्या क्वांग ही हीओचा १५-२१, २१-१५, २१-१६ असा पराभव केला. हा सामना एक तास आणि ६ मिनिटे रंगला. दुसरीकडे प्रणॉयने व्हिएतनामच्या टीएन मिन्ह नग्युएनचा २१-१४, २१-९ असा सहज पराभव केला.

यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा दोन भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत. एप्रिल महिन्यात सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत के. श्रीकांत आणि बी. साईप्रणीत अंतिम फेरीत झुंजले होते. त्या वेळी साईप्रणीतने कारकीर्दीतील पहिलेवहिले सुपर सीरिज विजेतेपद जिंकण्याची किमया साधली होती.

पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी यांनी कडवी झुंज दिली. परंतु अव्वल मानांकित लू चिंग याओ आणि यांग पो हॅन जोडीविरुद्ध त्यांचा निभाव लागला नाही. याओ-हॅन जोडीने हा सामना २१-१२, १२-२१, २२-२० असा जिंकला. समीर वर्मा आणि साईप्रणीत यांनी अनुक्रमे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि थायलंड खुली स्पर्धा जिंकल्यानंतर आता तिसरा ग्रॅण्ड प्रिक्स सुवर्णचषक भारतीय पुरुष खेळाडू जिंकणार आहेत.

बऱ्याच कालावधीनंतर अंतिम फेरी गाठल्याचा अतिशय आनंद होतो आहे. कोरियाच्या क्वांगविरुद्धची लढत आव्हानात्मक ठरली. त्याने सुरुवात छान केली. मला वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागला. त्याचे स्मॅशेसचे फटके वेगवान होते. परंतु नंतर मला उत्तम सूर गवसल्याने सामन्यावर नियंत्रण मिळवले.

– पारुपल्ली कश्यप, भारताचा बॅडमिंटनपटू