शेवटच्या सेकंदाला बंगाल वॉरियर्सच्या जांग कुन ली याची पकड करीत पाटणा पायरेट्सने बंगालविरुद्धची लढत २०-२० अशी बरोबरीत सोडविली. या स्पर्धेतील ही पहिलीच बरोबरी आहे. दुसऱ्या लढतीमध्ये पुणेरी पलटणने शेवटच्या पाच मिनिटांत चुका करत आपल्या पायावर पराभवाचा धोंडा पाडून घेण्याची परंपरा येथे कायम राखली, त्यामुळेच त्यांना प्रो कबड्डी लीगमध्ये जयपूर पिंकपँथर्स संघाकडून २९-३५ असा पराभव स्वीकारावा लागला.
अटीतटीच्या सामन्यातील पूर्वार्धात बंगालने १२-९ अशी तीन गुणांची आघाडी मिळविली होती. ३४ व्या मिनिटालादेखील त्यांच्याकडे १७-१५ अशी दोन गुणांची आघाडी होती. सामना संपण्यासाठी एक मिनिट बाकी असताना १९-१९ अशी बरोबरी झाली. तीस सेकंद बाकी असताना बंगालने पाटणाच्या संदीप नरेवाल याची पकड करीत २०-१९ अशी आघाडी मिळविली, मात्र शेवटच्या चढाईत कुन ली याला पाठविण्याची चाल बंगालच्या अंगलटी आली. त्याची ही जिंकू किंवा मरो अशी चढाई असल्यामुळे एक गुण मिळविण्यासाठी त्याने खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याची पकड झाली व बंगालचा विजय हुकला. बंगालकडून विनित शर्मा व कुन ली यांनी प्रत्येकी चार गुण नोंदविले. पाटणा संघाकडून गुरविंदरसिंगने चढाईत चार व पकडीत एक गुण घेतला. सुनीलकुमारने पकडीत चार गुण मिळविले.
जयपूर संघाने सुरुवातीपासूनच जोरदार चढाया व उत्कृष्ट पकडी करीत खेळावर नियंत्रण ठेवले होते. पुण्याच्या खेळाडूंनी केलेल्या अक्षम्य चुकांचाही त्यांना फायदा झाला. १४ व्या मिनिटाला पहिला लोण चढवीत त्यांनी १५-१० अशी आघाडी मिळविली. पूर्वार्धात त्यांनी १९-१३ अशी आघाडी वाढविली. हीच सहा गुणांची आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. शेवटच्या पाच मिनिटांमध्ये चढाई करताना केलेल्या चुका तसेच अनावश्यक पकडी करण्याचे अपयशी प्रयत्न यामुळेच पुण्यास जयपूरची आघाडी तोडता आली नाही. जयपूर संघाकडून सोनू नरेवाल याने एका सुपर रेडसह आठ गुण मिळविले तर राजेश नरेवाल व जसवीरसिंग यांनी प्रत्येकी सहा गुण नोंदविले. जयपूरचा हा दुसरा विजय आहे. पुण्याच्या प्रवीण नेवाळेने कर्णधारपदाची भूमिका पार पाडताना चढाईत दोन बोनस गुणांसह नऊ गुणांची कमाई केली. तुषार पाटीलने पाच गुण मिळविले.