अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण केलेल्या सामन्यात भरवशाच्या काशिलिंग आडकेची पकड झाली आणि यजमान दबंग दिल्लीने फक्त एका गुणाने गतविजेत्या पाटणा पायरेट्सकडून हार पत्करली. पाटण्याने या विजयासह प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. दिल्लीला मात्र आव्हान टिकवण्यासाठी आता उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहेत.

नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर दिल्ली आणि पाटण्याचा सामना सुरुवातीपासून रंगतदार ठरला. दिल्लीने मध्यंतराला १६-१४ अशी आघाडी मिळवली होती. मात्र दुसऱ्या सत्रात २९व्या मिनिटाला पाटण्याने दिल्लीवर लोण चढवला. त्यानंतर ३२-३१ अशा फरकाने पाटण्याने सामना खिशात घातला. पाटण्याकडून प्रदीप नरवाल (९ गुण) आणि राजेश मोंडल (७ गुण) यांच्या चढायांनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्लीकडून काशिलिंग आणि मेराझ शेख यांनी अष्टपैलू खेळ केला.

गुणतालिकेतील अव्वल स्थानासह आम्हाला उपांत्य फेरी खेळायची आहे. त्याच दृष्टीने आम्ही मार्गक्रमण करीत आहोत, असे सामन्यानंतर पाटणा संघाचे व्यवस्थापक कार्तिक यांनी सांगितले.

 फायर बर्ड्स अंतिम फेरीत

महिलांच्या प्रायोगिक स्वरूपातील विभागात फायर बर्ड्सने आइस दिवाज संघाचा २२-१३ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. रविवारी जेतेपदाच्या लढतीत त्यांची तेजस्विनी बाईच्या स्टॉर्म क्वीन्स संघाशी गाठ पडणार आहे. फायर बर्ड्सच्या पायल चौधरीने अष्टपैलू कामगिरी बजावली. तर गायत्रीने अप्रतिम पकडी केल्या. आइस बर्ड्सकडून सोनाली शिंगटे आणि सुमित्रा शर्मा यांनी अप्रतिम चढाया केल्या.  रविवारी हैदराबाद रात्री आठ वाजता महिलांचा अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे आणि रात्री नऊ वाजता पुरुषांची अंतिम फेरी होईल.