प्रदीप नरवाल विजयाचा शिल्पकार

मुत्सद्दी संघनायक मनजित चिल्लरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या पुणेरी पलटणने शेवटच्या क्षणापर्यंत तोलामोलाची लढत दिली. मात्र गतविजेत्या पाटणा पायरेट्सने ३१-२८ अशा फरकाने सामन्यावर प्रभुत्व मिळवत गुणतालिकेतील अव्वल स्थानासह सलग चौथ्यांदा प्रो कबड्डी लीगची उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. वर्चस्वपूर्ण चढाया करणारा प्रदीप नरवाल (१२ गुण) पाटण्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने यंदाच्या हंगामात चौथ्यांदा दहाहून अधिक गुण मिळवण्याचा पराक्रम दाखवला.

वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात मुंबईच्या टप्प्यातील अखेरच्या दिवशी पाटण्याने सुरुवातीपासूनच पुण्यावर दडपण आणले. १४व्या मिनिटाला पाटण्याने पहिला लोण चढवून मध्यंतराला १५-१० अशी आघाडी मिळवली. मग दुसऱ्या सत्रात प्रदीपने एका चढाईत तीन गडी बाद करण्याची किमया साधली. त्यामुळे २९व्या मिनिटाला पाटण्याने दुसरा लोण चढवून २६-१६ अशी आघाडी मिळवली. त्यावेळी हा सामना एकतर्फी होणार असे वाटत होते. पण दीपक हुडा (८ गुण) आणि अजय ठाकूर (६ गुण) यांच्या प्रयत्नांमुळे ३६व्या मिनिटाला पुण्याने पाटण्यावर पहिला लोण लादला आणि आशा जिवंत ठेवल्या. मात्र अखेरीच्या काही मिनिटांत पाटण्याने संयमी खेळ करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. बाजीराव होडगेने (५ गुण) अप्रतिम पकडी केल्या.

राकेश कुमारची अखेरच्या निर्णायक चढाईत मोहित चिल्लरने पकड केली. त्यामुळे बंगळुरू बुल्सने यू मुंबाचा २८-२७ असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. घरच्या मैदानावर यू मुंबाचा सलग दुसरा पराभव झाला. बंगळुरूच्या विजयात रोहित कुमारच्या नेत्रदीपक चढाया आणि मोहितच्या पकडींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आजचे सामने

दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरियर्स

तेलुगू टायटन्स वि. जयपूर पिंक पँथर्स

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.