प्रो कबड्डीचे जेतेपद आता चार अव्वल संघांसाठी दोन पावलांवर येऊन ठेपले आहे. हैदरबादच्या गचीबोवली स्टेडियमवर शुक्रवारी पाटणा पायरेट्स विरुद्ध पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. या सामन्यांमध्ये उत्तम बचाव असलेला संघच बाजी मारेल, असा विश्वास सर्व कर्णधारांनी व्यक्त केला.

सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत तेलुगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरी म्हणाला की, मागील हंगामात आमची बचाव फळी कमजोर होती. मात्र यंदा आम्ही कमालीची सुधारणा केली आहे. घरच्या मैदानावर पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी उत्सुक असून, ज्या संघाचा बचाव मजबूत तोच संघ जिंकेल. जयपूरचा संघनायक जसवीर सिंगनेही राहुलच्याच मतांना दुजोरा देताना सांगितले की, उपांत्य फेरीतील सर्वच संघ बलाढय़ आहेत. मात्र आमचा बचावावर पूर्ण विश्वास आहे. उपांत्य फेरी गाठली आहेच, आता विजेतेपद काबीज करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे पुणेरी पलटणचा कप्तान मनजीत चिल्लरने सांगितले.

आजचे सामने

  • वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
  • पाटणा पायरेट्स वि. पुणेरी पलटण
  • जयपूर पिंक पँथर्स वि. तेलुगू टायटन्स
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स