पेले यांचे मत

युवा खेळाडू घडवण्यासाठी ते जग पालथे घालत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळीही उदयोन्मुख खेळाडूंसाठी ते आदरस्थानी आहेत. मात्र मी किंवा मॅराडोना पुन्हा होणे नाही असे मत स्वत: पेले यांनी केली आहे. सुब्रतो चषकाच्या निमित्ताने ७४ वर्षीय पेले राजधानी दिल्लीत अवतरणार आहेत.

पुनश्च पेले होणे नाही. प्रत्येक खेळाडू वैशिष्टय़पूर्ण आणि वेगळा असतो. त्यामुळे मॅराडोना, झिनेदिन झिदान होणार नाही असे पेले यांनी स्पष्ट केले. ब्लॅक पर्ल अशी उपाधी मिळालेल्या पेले यांनी बलोन डि ओर या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर तीन वेळा नाव कोरले. कारकीर्दीत तब्बल १,२८३ गोल करण्याची अद्भुत कामगिरी पेले यांच्या नावावर आहे.

१९५८ साली १७ वर्षीय पेले यांनी ब्राझीलला पहिल्यांदा विश्वचषक जेतेपद मिळवून दिले होते. चार वर्षांनंतर ब्राझीलला जेतेपद राखण्यात पेले यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. १९७० मध्ये, सार्वकालीन महान संघाचा भाग असलेल्या पेले यांनी घरच्या मैदानावर मेक्सिकोविरुद्ध ब्राझीलला जेतेपद मिळवून दिले होते.

भारत २०१७ मध्ये १७ वर्षांखालील गटाच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. त्या दृष्टीने सुब्रतो चषकासारख्या युवा खेळाडूंना संधी देणाऱ्या स्पर्धाकडे लक्ष द्यायला हवे असे पेले यांनी सांगितले. युवा खेळाडूंच्या उर्जेला दिशा देण्यासाठी खेळ हे सर्वोत्तम माध्यम आहे. संघभावना जोपासण्यासाठी आणि सांघिक कार्यपद्धती समजून घेण्यासाठी खेळांची भूमिका महत्त्वाची आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

‘युवा खेळाडूंना प्रेरित करणे माझे काम आहे. आता फुटबॉल खेळणाऱ्या पिढीने मला खेळताना पाहिलेले नाही. मात्र तरीही माझ्याबद्दल त्यांच्या मनात आदरभाव आहे. फुटबॉलचा गौरवशाली इतिहास त्यांच्यापर्यंत संक्रमित करणे आवश्यक आहे. निवृत्त झाल्यापासून खेळाचा प्रसार करण्याचे काम मी सुरू केले आहे. जगभरातल्या चाहत्यांना भेटणे हा आनंददायी अनुभव असतो. १९७७ साली मी भारतात आलो होतो. त्या भेटीच्या आठवणी आजही मनात चिरंतन आहेत. भारतात फुटबॉलला चालना मिळत असताना भेट देणे उत्सुकतेचे आहे’, असे त्यांनी सांगितले.