वाका स्टेडियमच्या उसळत्या खेळपट्टीवर १९९२मध्ये साकारलेल्या शतकामुळे माझ्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. जणू मी गरुडझेपच घेतली. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला तोंड देताना शतक साकारल्यामुळे माझा आत्मविश्वास कमालीचा उंचावला होता, असे महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सांगितले.
‘‘पर्थची त्या वेळची खेळपट्टी सर्वात वेगवान समजली जायची. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करणे सोपे नव्हते. १९व्या वर्षीच मी त्या कसोटीत शतक झळकावू शकलो. माझ्या कारकिर्दीची ती सुरुवात होती. पण पर्थ कसोटीतील शतकामुळे मी जगातील कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्यासाठी आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज झालो होतो. त्यानंतर या शतकामुळेच मी अनेक वर्षे चांगली कामगिरी करू शकलो,’’ असे सचिनने सांगितले.