पाकिस्तान प्रिमिअर लीगचा विजेता संघ ‘पेशावर झल्मी’च्या संघ मालकाने वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याच्याबाबत केलेल्या धक्कादायक भाकित केले आहे. पेशावर झल्मी संघाकडून खेळलेला डॅरेन सॅमी लवकरच इस्लाम धर्माचा स्विकार करेल, अशी आशा आहे. तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा दिवस असेल, असे विधान पेशावर झल्मी संघाचा मालक जावेद आफ्रिदी याने केले.

जावेद आफ्रिदीने पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. डॅरेन सॅमीने इस्लाम धर्माचा स्विकार करणे हे माझ्यासाठीचे सर्वात मोठे यश ठरेल, असे विधान जावेद आफ्रिदीने व्हिडिओमध्ये केले आहे.

 

डॅरेन सॅमीला इस्लाम धर्म जाणून घेण्याची इच्छा असून तो त्याबाबत अभ्यास करत असल्याचेही त्याने सांगितले. इस्लाम धर्माबाबतची बरीच माहिती सॅमीला आणि तो ज्या पद्धतीने त्याचा अभ्यास करत आहे. तो नक्कीच एक दिवस या पवित्र धर्माचा स्विकार करेल, असे जावेद आफ्रिदी म्हणाला. माझ्यासह संपूर्ण संघासाठी हे मोठे यश असेल, असेही तो पुढे म्हणाला.

पाकिस्तान प्रिमिअर लीगमध्ये शाहिद आफ्रिदीच्या अनुपस्थितीत डॅरेन सॅमी याला संघाचे नेतृत्त्व देण्यात आले होते. पेशावर झल्मीने या स्पर्धेचे जेतेपद देखील पटकावले. डॅरेन सॅमीच्या नेतृत्त्वात वेस्ट इंडिजच्या संघाने याआधी दोन विश्वचषक जिंकले आहेत. पीपीएलच्या अंतिम फेरीत पेशावर झल्मी संघाने गडाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघावर मात केली होती.

सामना जिंकल्यानंतर डॅरेन सॅमीने पाकिस्तानच्या पाहुणचाराचे तोंडभरून कौतुक देखील केले होते. लाहोरमध्ये खेळण्याचा आनंद वेगळाच होता. सुरक्षेच्या बाबतीत देखील विशेष सुविधा मिळाली. येथे खेळण्याचा अनुभव खूप चांगला होता. वेस्ट इंडिज असो..भारत असो किंवा इतर कोणतेही ठिकाण असो..ज्यापद्धतीने इतर देशांत खेळतानाचे जे सुरक्षित वातावरण असते त्याचप्रमाणे येथेही मी निश्चिंत खेळू शकलो. चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळण्याने अखेरीस क्रिकेटचाच विजय झाला, असे सॅमी म्हणाला होता.