क्रिकेटपटूंनी खेळताना नियमांची पायमल्ली केल्यास सामनाधिकाऱ्यांकडून ताकीद मिळते. साधारणत: ही प्रक्रिया सामनाधिकाऱ्यांच्या कचेरीत पार पडते. परंतु इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनला अशा स्वरुपाची ताकीद भलत्याच ठिकाणी मिळाली. पीटरसनला चक्क विमानतळावरील प्रसाधनगृहात ही ताकीद मिळाली. विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे.  भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंचांच्या निर्णयाविरोधात नापसंती दर्शविल्याप्रकरणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पीटरसनला समज दिली. पण त्यासाठी निवडलेले ठिकाण पीटरसनच नव्हे, तर क्रिकेटरसिकांसाठीसुद्धा आश्चर्यकारक होते. रांची येथील सामन्यानंतर दोन्ही संघ मोहालीसाठी रवाना झाले. विमानतळावर पायक्रॉफ्ट यांनी आपले हे राहिलेले काम उरकून घेतले, पण प्रसाधनगृहात पीटरसनची मात्र चांगलीच गोची झाली.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंच एस. रवी यांनी पीटरसनला बाद ठरविल्यानंतर त्याने काही काळ मैदानावर थांबून आपली नाराजी प्रकट केली होती. टीव्ही रिप्लेमध्ये हा निर्णय संशयास्पद असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.