हल्ल्यातून सावरलेल्या झेक प्रजासत्ताकच्या टेनिसपटूची विजयी सलामी; अव्वल मानांकित अँजेलिक कर्बरचा धक्कादायक पराभव

पाच महिन्यांपूर्वी तिच्यावर राहत्या घरी चोरटय़ांनी चाकूने हल्ला केला होता.. त्या हल्ल्यात तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.. अन् तिची कारकीर्द संपुष्टात येईल की काय, असे सर्वानाच वाटू लागले.. या भीतीने तिच्या चेहऱ्यावर चिंता दाटून आली होती.. मात्र तिच्या चेहऱ्यावरील स्मित पुन्हा परतल्याचे पाहून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.. ही गोष्ट आहे झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हाची.. पाच महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर पुन्हा टेनिस कोर्टवर परतलेल्या क्विटोव्हाच्या हसऱ्या चेहऱ्याने सर्वाचे लक्ष वेधले. आयुष्यातील सर्वात मोठी लढाई जिंकून पुनरागमन केल्याचा आत्मविश्वास तिच्या डोळ्यांत दिसत होता. त्याच आत्मविश्वासाने खेळ करताना तिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेच्या पहिल्याच लढतीत अमेरिकेच्या ज्युलिया बोसरुपवर १ तास १३ मिनिटांत ६-३, ६-२ असा विजय मिळवत दणक्यात पुनरागमन केले.

या विजयानंतर समाजमाध्यमांवर क्वितोव्हाच्या लढाऊ वृत्तीची प्रशंसा होऊ लागली आहे. दिग्गज महिला टेनिसपटू मार्टिना नव्हरातिलोव्हा यांच्यासह अनेक टेनिसपटूंनी क्वितोव्हावर अभिनंदनाचा वर्षांव केला.

महिला एकेरीच्या दुसऱ्या लढतीत ३१व्या मानांकित इटलीच्या रॉबेर्टा व्हिन्सीला पराभवाचा सामना करावा लागला. प्युएर्तो रिकोच्या २४ वर्षीय मोनिका पुइगने ६-३, ३-६, ६-२ अशा फरकाने १ तास ५० मिनिटांत व्हिन्सीचे आव्हान संपुष्टात आणले. लॅटव्हियाच्या जेलेना ओस्टापेंकोने ४-६, ६-३, ६-२ अशा फरकाने अमेरिकेच्या लौइसा चिरिकोवर मात केली. जर्मनीच्या अँजेलिक कर्बरला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. फ्रेंच खुल्या स्पध्रेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होणारी कर्बर ही पहिलीच अव्वल मानांकित खेळाडू आहे. रशियाच्या एकाटेरिना माकारोव्हाने १ तास २२ मिनिटांच्या खेळात कर्बरवर ६-२, ६-२ असा सहज विजय मिळवला.

पुरुष एकेरीच्या लढतीत अर्जेटिनाच्या होरासिया झेबालॉसने ७-५, ६-३, ६-४ अशा फरकाने फ्रान्सच्या अँड्रियन मॅन्नारिन्होवर विजय मिळवला. ही लढत २ तास १२ मिनिटे चालली. २६व्या मानांकित लक्सम्बर्गच्या जायल्स म्युलरला पराभव पत्करावा लागला. स्पेनच्या गिलेर्मो गार्सिया-लोपेझने ३ तास २७ मिनिटांच्या संघर्षांनंतर म्युलरवर ७-६ (७-४), ६-७ (२-७), ६-२, ६-२ असा विजय मिळवला. स्पेनच्याच अल्बर्ट रामोस-व्हिनोलासने ६-७ (७-९), ६-१, ६-४, ६-२ अशा फरकाने रोमानियाच्या मॅरियस कोपीलवर ३ तास ५ मिनिटांच्या लढतीनंतर मात केली. पहिल्या सेटमधील पराभवानंतर अल्बर्टने चतुराईने खेळ करताना बाजी मारली.