ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजेसची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. मंगळवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शेफिल्ड शिल्ड सामन्यात उसळता चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ह्युजेसची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
मायकेल क्लार्क दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नसल्यामुळे २५ वर्षीय ह्युजेसला कसोटी पुनरागमनाची संधी मिळणार होती, परंतु मंगळवारी सीन एबॉटचा चेंडू डोक्याला खालच्या बाजूला लागल्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सेंट व्हिन्सेंट इस्पितळातील अतिदक्षता विभागात त्याला ठेवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पीटर ब्रुकनर यांनी ह्युजेसच्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘फिलची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. पुढील घडामोडींची मी तुम्हाला त्वरित माहिती देईन.’’
ह्युजेसची स्थिती आणि त्याच्यावरील उपचारांची माहिती देणारे पत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियानेसुद्धा काढले. ‘‘सिडनी येथे साऊथ ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजी करताना चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे फिल ह्युजेसला तातडीने सेंट व्हिन्सेंट इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अद्याप गंभीर आहे. सकाळी ह्युजेसच्या काही वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये काय आढळून आले, ते लवकरच आपल्याला कळू शकेल,’’ असे या पत्रकात म्हटले आहे.
न्यू साऊथ वेल्स आणि साऊथ ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान ह्युजेसला ही जिवावर बेतणारी दुखापत झाली. त्यानंतर हा सामना पुढे सुरू झाला नव्हता. या घटनेचा आदर करून शेफिल्ड शिल्डमधील चालू फेरीचे सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील व्हिक्टोरिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि अ‍ॅलन बोर्डर मैदानावरील क्विन्सलँड विरुद्ध टास्मानिया यांच्यातील सामने रद्द करण्याचा निर्णय सकाळी घेण्यात आला, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले.
‘‘आम्ही खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन समुपदेशन असोसिएशन (एसीए) यांच्याशी चर्चा करून देशातील खेळाडूंच्या भावना समजून घेतल्या. हा दिवस क्रिकेट खेळण्याचा नाही, याची आम्हाला जाणीव झाली,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी महाव्यवस्थापक (सांघिक कामगिरी) पॅट होवार्ड यांनी सांगितले.
‘‘या कठीण परिस्थितीत सर्व खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांना आम्ही समुपदेशन आणि पाठबळ दिले आहे. ह्युजेसला सर्वोत्तम दर्जाची वैद्यकीय व्यवस्था पुरवण्यात येत आहे. फिलचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी या अवघड प्रसंगाचा सामना करीत असताना संघसहकारी आणि क्रिकेटविश्वाच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत असतील,’’ असे होवार्ड यांनी सांगितले.
जुने हेल्मेट वापरले होते! : ‘मसुरी’चे स्पष्टीकरण
सिडनी : फिल ुजेसच्या घटनेनंतर क्रिकेटमधील सुरक्षा व्यवस्थापनाच्या साहित्यसामग्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ुजेसने जुने आणि कमी जाडीचे हेल्मेट वापरले होते, असे स्पष्टीकरण ‘मसुरी’ या हेल्मेट निर्मिती कंपनीने स्पष्ट केले आहे.
ब्रिटनस्थित कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ुजेसने शेफिल्ड शिल्डच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या न्यू साऊथ वेल्स आणि साऊथ ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याप्रसंगी नव्या प्रकारचे हेल्मेट वापरण्याऐवजी जुने हेल्मेट परिधान केले होते. कंपनी सध्या या घटनेच्या व्हिडीओ चित्रीकरणाचा अभ्यास करीत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्रांना या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रीकरण सध्या ‘मसुरी’कडे आले आहेत. चेंडू हेल्मेटच्या ग्रिलमधून ुजेसच्या डोक्यावर आदळला. ‘मसुरी’चे आधुनिक कसोटी हेल्मेट त्याने वापरले असते, तर असे घडले नसते.’’ ‘मसुरी’ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बाजारात आणलेले नवे हेल्मेट हे फलंदाजाच्या डोक्याच्या मागील भागाचे रक्षण करते, परंतु ुजेसने हे हेल्मेट वापरले नव्हते
क्रिकेट हा धोकादायक खेळ असून ज्यात अशा प्रकारे जोखीम असतेच. परंतु या घटना क्वचितच घडतात. रग्बी व मोटारस्पोर्ट्स खेळातसुद्धा जोखीम आहे. ह्य़ुजेसची घटना अतिशय वाईट असून, सध्या आपण फक्त प्रार्थना करू शकतो. संपूर्ण ऑस्ट्रेलिया व क्रिकेटविश्वाच्या प्रार्थनेतून ह्य़ुजेसची प्रकृतीच्या सुधारणेला बळ मिळो.
-ब्रायन लारा, वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज
दुखापत हा खेळाचा अविभाज्य भाग असतो. परंतु ह्य़ुजेसच्या घटनेप्रसंगी संकटकाळात दुखापतग्रस्त खेळाडूला इस्पितळात पोहोचवण्यासाठी यंत्रणा कशी कार्यरत होते, हे जगभरातील अब्जावधी टीव्हीप्रेक्षकांनी अनुभवले. या घटनेमुळे भारतीय क्रीडा प्रशासकांचे डोळे खडाडून जागे व्हायला हवेत!
-डॉ. पी. एस. एम. चंद्रन, ख्यातनाम क्रीडावैद्यकतज्ज्ञ