ह्युजे कुटुंबीयांच्या भावना
आमच्या कुटुंबीयातील लाडका पुत्र आणि भाऊ फिलिपच्या निधनामुळे आम्ही हादरलो आहोत. गेले काही दिवस अतिशय कठीण परिस्थितीशी आम्ही सामना केला. आम्हाला क्रिकेट ऑस्ट्रेलिया, मित्र, खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून जे पाठबळ मिळाले, त्याबद्दल आम्ही ऋणी राहू. क्रिकेट हे फिलिपचे जीवन होते आणि आमच्या संपूर्ण कुटुंबीयाने त्याचे हे प्रेम जपले. फिलिपच्या आयुष्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या सेंट व्हिन्सेंट इस्पितळातील वैद्यकीय अधिकारी आणि न्यू साऊथ वेल्सच्या वैद्यकीय अधिकारी यांचे मी आभार मानतो.

डाव तुझा येताच जमविशी  
जपून अपुली खेळी,
काळ करी बघ गोलंदाजी,
संकट चेंडू फेकी..
महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी गायलेल्या ‘हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा..’ या गाण्यातील या पंक्ती.. क्रिकेटमधीलच नव्हे, तर आयुष्यातील क्रूर वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या.. ऑस्ट्रेलियाचा हरहुन्नरी फलंदाज फिलिप ह्युजेसच्या मृत्यूची बातमी गुरुवारी कानावर आली आणि असंख्य क्रिकेटरसिकांच्या मनात याच ओळी तरळून गेल्या.. स्थानिक क्रिकेटमध्ये सीन अ‍ॅबॉटचा चेंडू लागून जखमी झालेला ह्युजेस गेले दोन दिवस मृत्यूशी झुंज देत होता. तो बरा व्हावा यासाठी सेंट व्हिन्सेंट इस्पितळाबाहेरच नव्हे तर जगभरातील अनेक ठिकाणी त्याचे चाहते प्रार्थना करीत होते; पण अखेर आपली क्रिकेटमधील उभरती कहाणी अधुरी सोडून ह्युजेस निघून गेला.
‘‘फिलिप ह्युजेस क्षणार्धात आपल्याला सोडून गेला आहे, हे तुम्हाला सांगण्याची कठीण जबाबदारी माझ्यावर आली आहे. मंगळवारी गंभीररीत्या जखमी झाल्यापासून तो बेशुद्धावस्थेतच होता. या घटनेचे गांभीर्य कळताच त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी त्वरेने इस्पितळात दाखल झाले होते,’’ असे ऑस्ट्रेलियन संघाचे डॉ. पीटर ब्रुकनर यांनी सांगितले.
ह्युजेसने आपल्या छोटेखानी कारकीर्दीत २६ कसोटी सामन्यांत ३२.६५च्या सरासरीने १५३५ धावा केल्या, k05यात तीन शतके आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. जुलै २०१३मध्ये लॉर्ड्स येथे तो आपल्या कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळला होता. याशिवाय २५ एकदिवसीय सामन्यांतसुद्धा तो खेळला आहे. एकदिवसीय पदार्पणात शतक झळकावणारा तो एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. गेल्या महिन्यात अबू धाबी येथे पाकिस्तानविरुद्ध तो अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर आठवडय़ाभरानंतर तो दुबई येथे आपल्या कारकीर्दीतील एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळला होता.
या घटनेमुळे क्रिकेटविश्व हादरले असून, भारत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना रद्द करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तान आणि न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळसुद्धा रद्द करण्यात आला. ह्युजेसचे सहकारी आणि क्रिकेटविश्वातील दिग्गजांनी या धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेबद्दल शोक प्रकट केला आहे. क्रिकेटविश्वासाठी हा दु:खद दिवस असल्याचे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघानेसुद्धा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला शोकसंदेश पाठवून श्रद्धांजली वाहिली आहे. ‘‘या दुर्दैवी घटनेतून सावरण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दैवी बळ मिळो. फिलिपसोबत खेळतानाच्या आठवणी आणि त्याने क्रिकेट या खेळाला दिलेले योगदान यांचा आम्ही आदर करतो,’’ असे यात म्हटले आहे.
मंगळवारी शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पध्रेतील साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यू साऊथ वेल्स यांच्यातील सामन्यात ही घटना घडली. अ‍ॅबॉटचा उसळणारा चेंडू हुक करण्याच्या प्रयत्नात असताना तो ह्युजेसच्या हेल्मेटच्या खाली डोक्यावर आदळला आणि तो खाली कोसळला. त्यावेळी तो ६३ धावांवर खेळत होता.
ह्युजेसला मैदानावरून इस्पितळामध्ये नेताना कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवण्यात आला. सेंट व्हिन्सेंट इस्पितळातील अतिदक्षता विभागात ह्युजेसवर ९० मिनिटांची तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
ह्युजेसच्या मृत्यूमुळे शोकसागरात बुडालेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे, असे नमूद केले. त्यांनी म्हटले की, ‘‘क्रिकेटमध्ये ‘दुर्भाग्यपूर्ण’ या शब्दाचा बऱ्याचदा उल्लेख केला जातो, पण हा जीवघेणा अपघात प्रत्यक्ष आयुष्यात दुर्भाग्यपूर्ण असाच आहे. फार कमी वयामध्ये फिल आमच्यापासून दुरावला. काही दिवसांनी त्याचा २६वा वाढदिवस होता. त्याच्या जाण्याने अतीव दु:ख झाले आहे.’’
ह्युजेसचा जिवाभावाचा मित्र आणि संघसहकारी क्लार्क त्याला इस्पितळात दाखल केल्यापासून तिथे जातीने हजर होता. याशिवाय ब्रॅड हॅडिन, स्टीव्हन स्मिथ, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, नॅथन लिऑन, मोझेस हेन्रिक्स, मिचेल स्टार्क, डॅनियल स्मिथ, प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी इस्पितळाला भेट दिली होती. मंगळवारी अ‍ॅबॉटसहित न्यू साऊथ वेल्सच्या संपूर्ण संघाचे समुपदेशन करण्यात आले होते.

दु:खद आणि दुर्दैवी!ही सर्वात दु:खद आणि दुर्दैवी घटना आहे. त्याच्या कुटुंबाप्रीत्यर्थ मी सहानुभूती व्यक्त करतो. यापुढे अजून काय बोलायचे ते सूचत नाही. क्रिकेट विश्वामध्ये हेल्मेट आल्यानंतर अशी घटना होईल, असे मला वाटले नव्हते. फिलीपने चांगल्या दर्जाचे हेल्मेट वापरले होते, पण अपघात होतात आणि ही घटना त्यापैकीच एक आहे.
*नरी कॉन्ट्रॅक्टर, भारताचे माजी कर्णधार

क्रिकेट विश्वासाठी ही दु:खद घटना आहे. बऱ्याच खेळाडूंना यापूर्वी दुखापत झाली असली तरी फार कमी जणांच्या जिवावर बेतले आहे. यापूर्वी रमण लांबाचाही असाच दुर्दैवी मृत्यू झाला होता, पण त्या वेळी तो ‘शॉर्ट लेग’ला क्षेत्ररक्षण करत होता. फिलला उसळता चेंडू टाकणाऱ्या अ‍ॅबॉटच्या मनात भीषण भावना असेल, पण खेळामध्ये असे दुर्दैवी प्रकार होत असतात, त्यामध्ये अ‍ॅबॉटची काही चूक नाही. हा फक्त दैवदुर्विलास आहे.
*दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी क्रिकेटपटू.

फिलबद्दल ऐकून धक्काच बसला. क्रिकेट विश्वासाठी हा दु:खद दिवस आहे. त्याच्या कुटुंबीयांप्रीत्यर्थ मी सहानुभूती व्यक्त करतो.
*सचिन तेंडुलकर, भारताचा माजी क्रिकेटपटू

फिलची बातमी ही दु:खद आणि धक्कादायक आहे. क्रिकेटसाठी हा भयावह दिवस आहे. या दु:खातून त्याच्या कुटुंबीयांना परमेश्वर बळ देवो.
*विराट कोहली, भारताचा फलंदाज

क्रिकेट विश्वासाठी हा काळा दिवस आहे. फिल आपल्यामध्ये नाही यावर विश्वास बसत नाही. ही धक्कादायक आणि वेदनादायक घटना आहे.
*युवराज सिंग, भारताचा क्रिकेटपटू

‘लिट्ल चॅम्प’ला मी श्रद्धांजली वाहतो. आम्हाला नेहमीच तुझी आठवण येईल. फिलच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो.
*डॅरेन लेहमन, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक

या घटनेनंतर काय बोलावे तेच सूचत नाही. फिल ज्या जगामध्ये गेला आहे तिथे तो चांगला राहो. त्याला श्रद्धांजली अर्पण करताना त्याच्या कुटुंबीयांना या दु:खातून बाहेर येण्याचे बळ मिळो.
*मार्क बाऊचर, दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक

सकाळी सर्वात वाईट बातमी कानावर पडली. फिलच्या निधनाने दु:ख झाले आहे. मी फिल आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करेन.
*महेला जयवर्धने, श्रीलंकेचा क्रिकेटपटू

सर्वात वाईट बातमीने सकाळ उजाडली. फिल  नेहमीच माझ्या स्मरणात राहील. त्याच्या कुटुंबीयांबद्दल सहानूभूती व्यक्त करतो.
*ख्रिस गेल, वेस्ट इंडिजचा सलामीवीर

क्रिकेट विश्वासाठी हा सर्वात वाईट दिवस आहे. फिल आणि त्याच्या कुटुंबीयांविषयी दु:ख वाटते. यासाठी सीन अ‍ॅबॉटला माफ करा.
*इयान बोथम, इंग्लंडचे माजी कर्णधार.

जीवावर बेतलेल्या घटना..
*जॉर्ज समर्स (इंग्लंड, १८७०) :
लॉर्ड्स मैदानावर एमसीसीविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे जॉर्ज समर्स जागीच कोसळले. काही दिवसांनंतर याच घटनेमुळे त्यांना प्राण गमवावे लागले.

*अब्दुल अझिझ (पाकिस्तान, १९५८-५९)
 पाकिस्तानचा यष्टिरक्षक अब्दुल अझिझ फलंदाजी करत असताना गोलंदाजाचा चेंडू त्याच्या छातीच्या वरच्या भागावर आदळला. बेशुद्धावस्थेतच तो मैदानावर कोसळला. त्यानंतर रुग्णालयात नेत असताना वयाच्या १७व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.

*इयान फोले (इंग्लंड, १९९३) :
एका स्थानिक सामन्यात हूकचा फटका मारताना चेंडू इयान फोले यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला बसला. रुग्णालयात नेण्यात आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका बसला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

*रमण लांबा (भारत, १९९८) :
डोक्याला मार लागून भारतीय क्रिकेटपटू रमण लांबाचा मृत्यू झाला. फेब्रुवारी १९९८ मध्ये बांगलादेशमधील स्थानिक लीगमध्ये फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असताना भारताचे माजी क्रिकेटपटू रमण लांबा यांच्या डोक्याला मार बसला. ढाका येथील रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण तीन दिवसांनंतर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

*अल्क्विन जेनकिन्स (इंग्लंड, २००९) :
स्वानसी येथील लीग सामन्यात पंचगिरी करत असताना एका क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू ७२ वर्षीय अल्क्विन जेनकिन्स यांच्या डोक्यावर बसला. हेलिकॉप्टरने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

*डॅरिन रँडल
(दक्षिण आफ्रिका, ऑक्टोबर २०१३) :
प्रीमिअर लीगमधील सामन्यात पूलचा फटका मारताना चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला. जागीच कोसळल्यानंतर त्याला अलिस रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला.

*झुल्फिकार भट्टी
(पाकिस्तान, डिसेंबर २०१३) :
सुपरस्टार क्रिकेट क्लबकडून फलंदाजी करीत असताना एक उसळता चेंडू झुल्फिकार भट्टीच्या छातीवर आदळला. त्यानंतर मैदानावरच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वयाच्या २२व्या वर्षी एका अव्वल क्रिकेटपटूला गमावण्याची वेळ पाकिस्तानवर आली.

*फिल ह्य़ुजेस (ऑस्ट्रेलिया, नोव्हेंबर २०१४):
शेफिल्ड शिल्ड स्पर्धेदरम्यान सीन अ‍ॅबॉटचा चेंडू डोक्यावर आदळल्यानंतर फिल ह्य़ुजेस थेट कोमात गेला. सिडनीतील सेंट व्हिन्सेंट रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण दोन दिवसांनंतर त्याची झुंज संपुष्टात आली.

भारताचा सराव सामना रद्द
अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिल ह्य़ुजेसच्या निधनानंतर भारताचा दुसरा सराव सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघ शुक्रवारपासून क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाबरोबर दोनदिवसीय सराव सामना खेळणार होता, पण फिलच्या निधनाचा धक्का साऱ्यांनाच बसला असल्याने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्थानिक शेफिल्ड शिल्डचे सामने रद्द केले आहेत.

पाकिस्तान-न्यूझीलंड कसोटीचा दुसरा दिवस रद्द
शारजा : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिल ह्य़ुजेसच्या निधनाची बातमी समजल्यावर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस रद्द करण्यात आला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाने एकत्र येत हा निर्णय सकाळी घेतल्यामुळे दुसऱ्या दिवसाचा सामना रद्द करण्यात आला.

ह्य़ुजेसच्या मृत्यूचा अ‍ॅबॉटला जबर धक्का
सिडनी : ज्याच्या उसळत्या चेंडूने फिल ह्य़ुजेसला प्राण गमवावे लागले, त्या सीन अ‍ॅबॉटला ह्य़ुजेसच्या k03मृत्यूमुळे धक्का बसला आहे. ह्य़ुजेस मैदानावर कोसळल्यानंतर त्याला मदत करणारा अ‍ॅबॉट हा पहिला खेळाडू होता. गुरुवारी दुपारी तो ह्य़ुजेसला पाहण्यासाठी सेंट व्हिन्सेंट रुग्णालयात गेला होता. त्या वेळी रुग्णालयात उपस्थित असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूंनी सांत्वन करून त्याला धीर दिला होता. मात्र ह्य़ुजेसच्या मृत्यूने अ‍ॅबॉटला मोठा धक्का बसला असून सध्या मित्रमंडळी आणि मानसोपचारतज्ज्ञांकडून त्याला मार्गदर्शन केले जात आहे.

प्राण वाचवण्यासाठी डॉ. ऑर्चर्ड यांची शर्थ
सिडनी : सीन अ‍ॅबॉटचा चेंडू डोक्यावर आदळल्यानंतर फिल ह्य़ुजेसच्या मदतीसाठी मैदानावरील सर्व k04क्रिकेटपटू धावले. त्या वेळी डॉक्टर जॉन ऑर्चर्ड यांचे प्रयत्न सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. सेंट विन्सेंट रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी ऑर्चर्ड यांनी ह्य़ुजेसला मैदानावरच प्राथमिक उपचार दिले. ऑर्चर्ड यांनी ह्य़ुजेसला तोंडाने श्वासोच्छवास देत, हाताने छाती दाबत ह्य़ुजेसचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर हेलिकॉप्टरने ह्य़ुजेसला रुग्णालयात नेण्यापर्यंत त्यांचे प्रयत्न सुरूच होते. ह्य़ुजेस बरा होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही ऑर्चर्ड यांनी केले होते. पण डोक्याला मार बसल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांना धक्का पोहोचला होता. त्यामुळे त्याच्या मेंदूतच रक्तस्त्राव झाला होता. अखेर दोन दिवसांच्या झुंजीनंतर ह्य़ुजेसची प्राणज्योत मालवली.
दोन्ही मंडळांनी पहिल्या कसोटीचा निर्णय घ्यावा – सुनील गावस्कर
‘‘ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिल ह्य़ुजेसच्या निधनाने सर्वानाच दु:ख झाले असून पहिला सामना खेळण्याची K01भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील खेळाडूंची मानसिकता असेल, असे वाटत नाही. त्यामुळे दोन्ही क्रिकेट मंडळांनी चर्चा करून पहिल्या कसोटी सामन्याबाबत निर्णय घ्यावा, ’’असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
‘‘ह्य़ुजेसचे निधन ही सर्वात वाईट घटना आहे. या दोन्ही संघांतील खेळाडूंवर या घटनेचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आठवडय़ाभरावर आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणे दोन्ही संघांना अवघड जाईल. कारण या घटनेनंतर त्यांची सामना खेळण्याची मानसिकताच नसेल. जेव्हा फिलिपचे निधन झाले, तेव्हा ऑस्ट्रेलियातील स्थानिक सामने रद्द केले गेले. त्यामुळे पहिला सामना रद्द करावा की पुढे ढकलावा, याबाबत निर्णय घ्यावा,’’ असे गावस्कर म्हणाले.k02