प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिचा खून केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियसची चौकशी सुरू असून या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यावरच खुनाचे आरोप असल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तिसऱ्या दिवशी पिस्टोरियस न्यायालयात हजर झाल्यानंतर पोलिसांनीच ही धक्कादायक बातमी उघड केली. पिस्टोरियसने केलेली हत्या पूर्वनियोजित असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे असले तरी हा एक अपघात होता, अशी बाजू बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडली. पोलीस अधिकारी हिल्टन बोथा यांच्या विश्वासार्हतेवर आक्षेप घेण्यात आला असून २००९ मध्ये एका टॅक्सीवर त्यांनी बेछूट गोळीबार केल्याचे आरोप आहेत, असे पोलीस प्रवक्ते नेविले मालिला यांनी सांगितले. पिस्टोरियसला जामीन नाकारला गेल्यास, या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत त्याला बरेच महिने किंवा वर्षभर जेलमध्येच राहावे लागेल. अपंगत्वाचा फायदा घेऊन तो जामिनासाठी आपली बाजू मांडेल की नाही, हे गुरुवारीच स्पष्ट होईल.