कटकमधील दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी केलेले वर्तन खेळासाठी अशोभनीय असून या चुकांमधून त्यांनी बरेच काही शिकायला हवे, असे मत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.‘‘प्रेक्षकांनी जे काही सामन्यादरम्यान केले ते खेळासाठी चांगले नाही. यापूर्वीही अशी घटना घडली होती. आपण चुकांमधून शिकायला हवे. भारतामध्ये बहुतांशी क्रिकेटवेडे आहे, खेळावर त्यांचे अतोनात प्रेम आहे. सारेच या सामन्यातील कामगिरीने निराश असतील. पण या पद्धतीने व्यक्त होणे चुकीचे आहे. याप्रकारे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता कामा नये, असे सचिन म्हणाला. तो पुढे म्हणाला की, चाहत्यांनी अधिक परिपक्व होण्याची गरज आहे. निराशा व्यक्त करण्याचे काही अन्यही मार्ग असतात.’’