दक्षिण आफ्रिकेच्या भारतीय दौऱ्याबद्दल मी चिंतेत आहे. कारण या दौऱ्यात त्यांना चार कसोटी सामने खेळावे लागणार आहेत आणि भारतात चार कसोटी सामने खेळणे सोपे नसते, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने व्यक्त केले आहे.
‘‘भारतीय दौऱ्याबाबत मी थोडा बेचैन आहे. कारण हा दौरा दक्षिण आफ्रिकेसाठी नक्कीच सोपा नसेल. कारण हा दौरा जास्त कालावधीचा असल्यामुळे त्यांच्यासाठी हा कसोटीचा काळ असेल,’’ असे स्मिथ म्हणाला.
भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांबद्दल स्मिथ म्हणाला की, ‘‘भारतामध्ये चार कसोटी सामने खेळणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. कारण एक तर तुम्हाला जास्त प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर वातावरणाचा फरक पडतो आणि खेळपट्टी फिरकीला अनुकूल अशी असते. मी आशा करतो की, हा दौरा त्यांना चांगला जाईल. कारण हा दौरा चांगला गेला तर यानंतर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी त्यांचा आत्मविश्वास उंचावेल.’’