अजय सिंग, अध्यक्ष, भारतीय बॉक्सिंग महासंघ

चार वर्षांत भारतीय बॉक्सिंगची बरीच पीछेहाट झाली. जे झाले, त्याची चर्चा करण्यापेक्षा आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. राजकारणाचा भाग बाजूला ठेवून बॉक्सिंग या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा आमचा निर्धार आहे, असे स्पष्ट मत नवीन स्थापन झालेल्या भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी व्यक्त केले. रविवारी मुंबईत पार पडलेल्या या निवडणुकीत देशभरातील ३३ संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांच्या साक्षीने सिंग यांनी बॉक्सिंगच्या विकासाची ग्वाही दिली. निवडणुकीच्या निमित्ताने अजय सिंग यांनी बॉक्सिंगच्या पुढील वाटचालीबाबत केलेली सविस्तर चर्चा-

  • भारतात तिसऱ्यांदा बॉक्सिंग संघटनेची स्थापना होत आहे. या आधीच्या अनुभवानुसार ही संघटना किती काळ कार्यरत राहील, असे तुम्हाला वाटते?

ही भारतीय बॉक्सिंगसाठी दुर्दैवाची बाब आहे. पण आधीच्या अनुभवानुसार याही संघटनेबाबत अंदाज बांधू नका. आधीच्या संघटनांमध्ये अनेक त्रुटी होत्या आणि त्यामुळेच त्यांना भरुदड सोसावा लागला. आज तुम्ही पाहाल तर देशभरातील सर्वच संलग्न राज्य संघटनांचे प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत. ६६ पैकी ६४ जणांनी मतदान केले आहे. केंद्र सरकारचे आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे प्रतिनिधीही येथे उपस्थित आहेत. आधीच्या चुका टाळण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि त्यामुळे भारतीय बॉक्सिंगसाठी हा आनंदाचा दिवस आहे. यापूर्वीच्या संघटनांमधील असलेले राजकारण बाजूला ठेवून बॉक्सिंगसाठीच सर्व एकत्र आले आहेत आणि खेळाचा विकास हेच आमचे लक्ष्य आहे.

  • यापुढे तुमचे पाऊल काय असेल?

खूप काही गोष्टी डोक्यात आहेत. त्या हळूहळू अमलात आणण्याचा प्रयत्न आहे. पण हे करताना बॉक्सिंग हेच आमचे लक्ष्य असेल. खेळाच्या विकासासाठी जे काही करायचे आहे, त्याबाबत सहकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली जाईल. पायाभूत सुविधांपासून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, बॉक्सिंग अकादमीची स्थापना आदी अनेक कल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवणार आहेत. आमचे यश हे  खेळाडूंच्या कामगिरीतून दिसेल. केवळ मोठेपणा न दाखवता त्यांची अंमलबजावणी करण्याचा महासंघाचा प्रयत्न असेल.

  • राष्ट्रीय स्पर्धाच्या आयोजनासाठी अजून किती काळ लागेल?

आजच निवडणूक झाली आहे आणि त्यामुळे यासाठी थोडा वेळ लागेल. कार्यकारिणी सदस्यांशी आत्ता चर्चा करून कृती आराखडा तयार करणार आहे. राज्य संघटनांनीही स्पर्धा आयोजनासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ. पुरुष व महिला, तसेच मुले व मुली अशा सर्वासाठी जास्तीत जास्त स्पर्धा आयोजनाचा आमचा प्रयत्न असेल. बॉक्सिंग लीगही सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

  • भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) निवडणुकीसाठी प्रतिनिधी पाठवले नव्हते. त्याचा या नवीन संघटनेवर भविष्यात काही परिणाम जाणवेल का?

मला नाही वाटत, तसे काही घडेल. या निवडणुकीसाठी केंद्र सरकारचे आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे प्रतिनिधीही येथे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय महासंघाची मान्यता पुरेशी आहे.