४ बाद २२ अशा स्थितीत मैदानात उतरलेल्या केव्हिन पोलार्डने संयमी शतकी खेळी साकारली. मात्र त्याची ही शतकी खेळी वेस्ट इंडिजला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि ऑस्ट्रेलियाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्सनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र मिचेल जॉन्सनच्या भेदक माऱ्यासमोर त्यांची ४ बाद २२ अशी अवस्था झाली. यानंतर पोलार्डने एका बाजूने किल्ला लढवत ११ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०९ धावांची खेळी केली. पोलार्डने नवव्या विकेटसाठी सुनील नरिनसह ६४ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स पडत असल्याने वेस्ट इंडिजचा डाव २२० धावांत आटोपला. जॉन्सनने ३६ धावांत ३ तर बेन कटिंगने ४५ धावांत ३ बळी टिपले.
शेन वॉटसनच्या ७६ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य पूर्ण केले. मायकेल क्लार्कने ३७ धावा केल्या. झुंजार शतक झळकावणाऱ्या केव्हिन पोलार्डला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.