* वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर २७ धावांनी विजय
* चार्लेसचे अर्धशतक; अष्टपैलू पोलार्ड सामनावीर
एकदिवसीय मालिकेत ५-० असा मानहानीकारक पराभव पदरी पडला असला तरी एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात ऐतिहासिक २७ धावांनी विजय मिळवत वेस्ट इंडिजने दौऱ्याचा शेवट मात्र गोड केला. तब्बल १६ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत पराभूत करण्याची किमया वेस्ट इंडिजने यावेळी साधली, यापूर्वी १९९७ साली वेस्ट इंडिजने पर्थ येथे ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते, पण त्यानंतर मात्र कोणत्याही क्रिकेटच्या प्रकारात त्यांना ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत पराभूत करता आले नव्हते. सलामीवीर जॉन्सन चार्लेसचे अर्धशतक, त्याला डॅरेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्ड यांची साथ मिळाल्याने वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियापुढे १९२ धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना पोलार्ड ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दर्जेदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पोलार्डनेच सामनावीरचा पुरस्कार पटकावला.
वेस्ट इंडिजची चांगली सुरुवात झाली नसली तरी चार्लेसने ३५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारत संघाला स्थैर्य मिळवून दिले. ब्राव्हो (३२) आणि पोलार्ड (२६) यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे संघाला १९१ धावांचा टप्पा गाठता आला. १९२ धावांचा पाठलाग करताना अ‍ॅडन व्होग्सने (५१) अर्धशतक झळकावत संघाचा चांगली सुरुवात करून दिली. पण सुनील नरीन आणि पोलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद करत वेस्ट इंडिजला २७ धावांनी विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : २० षटकांत ६ बाद १९१ (जॉन्सन चार्लेसचे ५१, डॅरेन ब्राव्हो ३२, किरॉन पोलार्ड २६ ;  जेम्स फॉऊल्कर ३/२८) विजयी वि. ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ८ बाद १६४ (अ‍ॅडम व्होग्स ५१; किरॉन पोलार्ड ३/३०, सुनील नरीन २/१९) सामनावीर : किरॉन पोलार्ड.