भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या पूनमला नोकरीची अपेक्षा

कोणत्याही क्रीडा प्रकारात आपण भारतीय संघाचे नेतृत्व करावे, असे स्वप्न खेळाडूंना पडत असते. मात्र, प्रत्येकाच्या वाटय़ाला ते यश येत नाही. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना नागपूरच्या पूनम गणेश कडाव हिने मेहनत आणि जिद्दीच्या बळावर आपले स्वप्न साकार केले. आज पूनम ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे सुरू असलेल्या आशियाई महिला कल्ब लीग हॅण्डबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघात निवड झालेली पूनम महाराष्ट्रातील एकमेव हॅण्डबॉलपटू असून तिला आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहेत.

muzaffar beg kashmir loksabha
काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज; पहाडी नेते मुझफ्फर बेग यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल का?
sharad pawar
‘गोविंदबागे’त जेवायला या! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण!
Congress Aggressive Against Agnipath scheme  Promise to cancel if come to power
‘अग्निपथ’विरोधात काँग्रेस आक्रमक; सत्तेवर आल्यास रद्द करण्याचे आश्वासन, खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र
Shiv Sainik Manohar Joshi passed away Mumbai
बाळासाहेबांचा विश्वास लाभलेला शिवसैनिक; नगरसेवक, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष..

पूनमचे वडील गणेश कडाव हे नागपूर महापालिकेत सफाई कामगार आहेत, तर आई रमाबाई धुणीभांडी करते. अजनी येथील चुनाभट्टी परिसरात एका दहा बाय पंधराच्या खोलीत कडाव परिवार राहतो. घरी खेळाची पाश्र्वभूमी नसतानाही पूनमने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे चौफेर कौतुक होत आहे.

धंतोली येथील टिळक विद्यालयात शिकत असताना तिची यशवंत स्टेडियम येथे हॅण्डबॉलची ओळख झाली. पूनम दररोज यशवंत स्टेडियम गाठायची. तेथे दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त सीताराम भोतमांगे व डॉ. सुनील भोतमांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरू झाला. शालेय स्तरापासूनच पूनमने आपली चमक दाखवण्यास सुरुवात केली. तिच्या खेळापासून प्रभावित झालेले प्रशिक्षक सुनील भोतमांगे यांनी पूनमचे घर गाठले. तेव्हा तिच्या घरची अर्थिक परिस्थती बघून त्यांनी तिला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. पूनम आत्मविश्वासाने सराव करून प्रगती करायला लागली. २००८ मध्ये तिला सोलापूर येथे पहिल्यांदा राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यानंतर आठव्या वर्गात असताना छत्तीसगड येथे राष्ट्रीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. त्यानंतर तामिळनाडू येथील ज्युनियर हॅण्डबॉल स्पर्धेत भरारी घेतली. पूनमचा प्रगतीचा आलेख वाढतच होता. मात्र, घरची परिस्थती बिकट असल्याने अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागाला. मात्र, मुलगी खेळात प्रगती करत असल्याचे बघून तिच्या आई-वडिलांनी अनेकदा उसणे पैसे घेऊन पूनमला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा तिच्या मनात असतानाच पूनमची बांगलादेश येथे ९ ते १३ ऑक्टोबर २०१६ मध्ये ज्युनियरच्या आयएचएफ चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, तेथे जाण्यास तिला हवी असलेली मोठी रक्कम कुठून आणणार असा प्रश्न पालकांना पडला, परंतु सुनील भोतमांगे यांनी तो सर्व खर्च उचलला अन् पूनमने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. वरिष्ठ गटात भारतासाठी खेळायचे हे स्वप्न तिने उराशी बाळगत तयारी सुरू केली अन् आज आपले तेही स्वप्न पूर्ण झाले. तिच्या वडिलांनी अनेक नेत्यांना आर्थिक मदतीसाठी विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनाही पत्र लिहिले. अनेक आमदार, मंत्री यांच्याकडे चकरा मारल्या. मात्र, कोणीही पूनमच्या कामगिरीची दखल घेतली नाही. महाराष्ट्रासह नागपूरचा मान उंचवणाऱ्या पूनमला आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून केवळ नोकरीची अपेक्षा आहे. तिची लहान बहीण नितीशा देखील हॅण्डबॉलपटू आहे. पूनम कोराडी येथील तायवाडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.