महिला क्रिकेट सामन्यांना तुरळक गर्दी होण्याचे खापर भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने स्पोर्ट्स वाहिन्यांवर फोडले. महिला क्रिकेट सामने टेलिव्हिजनवर दाखवले जात नसल्यानेच सामन्यांना प्रेक्षकवर्ग कमी असल्याचे मिताली राजचे म्हणणे आहे. दक्षिण आफ्रिकविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर मितालीची एका स्थानिक वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली.

”भारतात क्रिकेटसाठी प्रेक्षकवर्ग खूप असतो. पण तुम्ही खेळाचं सादरीकरण कसं करता यावर त्याची लोकप्रियता अवलंबून आहे. जर तुम्ही द्विपक्षीय मालिका खेळत असाल तर सामन्याचे प्रक्षेपण होणं महत्त्वाचं आहे. सामना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलचं जात नाही हे दुर्देव आहे.”, असे मिताली राज म्हणाली.

 

आयर्लंड, झिम्बाब्वे, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळविण्यात आलेल्या मालिकेत भारतीय संघाने अंतिम फेरीत द.आफ्रिकेवर ८ विकेटने विजय प्राप्त करून मालिका जिंकली. भारतीय संघाने गेल्या पाच सामन्यांमध्ये द.आफ्रिकेचा चार वेळा पराभव केला. पण अंतिम फेरीसाठी मैदानात तुरळक गर्दी होती.