मुंबईचा १४ वर्षांखालील संघ नुकताच जाहीर झाला आणि त्याची प्रथमच ‘न भूतो न भविष्यती’ अशी चर्चा झाली. कारण या संघात निवड झाली आहे ती अर्जुन सचिन तेंडुलकरची! स्वाभाविकपणे सचिनला दैवत मानणाऱ्या क्रिकेटजगताने या ‘मास्टरपुत्रा’च्या निवडीचे जल्लोषात स्वागत केले. याच संघातला आणखी एक मुलगाही सरावापासूनच लक्ष वेधून घेत आहे. घरच्या गरिबीला आणि प्रतिकूल परिस्थितीला जिद्दीची झालर लावू पाहाणारा हा मुलगा म्हणजे जहागीर अन्सारी.
क्रिकेट हा जितका लोकप्रिय तितकाच नव्या खेळाडूसाठी दिवसेंदिवस खर्चिक होत चाललेला खेळ. क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचे तर प्रशिक्षणाच्या शुल्काइतकाच क्रिकेट साहित्यासाठीही पैसा ओतावा लागतोच. त्यामुळेच घरची गरिबी असूनही जिद्दीने क्रिकेटच्या रणांगणात उतरलेल्या जहागीरची कहाणी मनाला स्पर्शून जाते.
अहमदाबादला होणाऱ्या पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर या संघाचा सध्या कसून सराव सुरू आहे. त्या सरावात जहागीर अन्सारीची वेगवान गोलंदाजी हा कौतुकमिश्रित चर्चेचा विषय ठरली आहे.
बेलापूरच्या आग्रोली गावात राहणारा जहागीर हा बेलापूरच्या विद्याप्रसारक हायस्कूलमध्ये आठव्या इयत्तेत शिकतो. पण ग्लेन मॅकग्राप्रमाणे जगातील अव्वल दर्जाचा वेगवान गोलंदाज होण्याचे स्वप्न त्याने जोपासले आहे. घरची परिस्थिती बेताचीच, त्यामुळे प्रत्येक पायरीवर खिशाकडे पाहावे लागते. बेलापूर स्थानकानजीक असलेल्या आग्रोली गावात ‘मॉर्डर्न टेलर’ नावाने मोठय़ा भावाचे दुकान आहे. १० बाय १०चे हे दुकान म्हणजेच अन्सारी बंधूंचे घर. त्यामुळे शिक्षण घेताना हा जहागीर मोठय़ा भावाला शिवणकामात मदतही करतो. कारण याच व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. याचप्रमाणे गावाकडे असलेल्या आई-वडिलांना पैसेही पाठवावे लागतात. ‘जहागीरला मोठा क्रिकेटपटू म्हणून घडविण्यासाठी मी भरपूर मेहनत करीन,’ असे त्याचा मोठा भाऊ सत्तार अभिमानाने सांगतो.
व्यावसायिक क्रिकेट जोपासायचे तर प्रख्यात कंपनीचे साहित्य (किट्स) असावे लागते. याची किंमत ३० हजारांच्या आसपास जाते. छोटय़ा भावाला शूजसहित हे चांगले साहित्य मिळावे म्हणून काही जणांकडून कर्जाऊ रक्कम घेत सत्तारने ही पुंजी जमा केली. खेळासाठी खूप खर्च येतो. प्रसंगी उपाशीपोटीही झोपावे लागते, हे सांगताना त्याच्या डोळ्यांमध्ये आसवे आली. झहीर शेख आणि जलाल शेख यांचे मार्गदर्शन सध्या जहागीरला लाभत आहे.
अहमदाबादला २० जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय स्पध्रेसाठी मुंबईच्या संघाचा सराव चालू असून, जहागीर आपल्या भावासमवेत लोकलचा प्रवास करून सध्या दररोज सकाळी बीकेसी गाठतो आहे. याच ठिकाणी अलिशान बीएमडब्ल्यू कारमधून अर्जुन तेंडुलकर आपल्या दोन सुरक्षारक्षकांसह पाच जणांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसहित सरावाला येतो.