रशियाविरुद्ध आज लढत; आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक

युरोपियन चॅम्पियन पोर्तुगाल संघ आणि कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची कॉन्फेडरेशन फुटबॉल चषक स्पध्रेत बुधवारी कसोटी लागणार आहे. या स्पध्रेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या पोर्तुगाल आणि रोनाल्डो यांना सलामीच्या लढतीत मेक्सिकोविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले आणि त्यामुळे स्पध्रेत आगेकूच करण्यासाठी त्यांना उर्वरित लढतीत विजय मिळवणे आवश्यक झाले आहे. बुधवारी त्यांना ‘अ’ गटातील अव्वल संघ म्हणून ख्याती असलेल्या यजमान रशियाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. रशियाने सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर विजय मिळवत संपूर्ण तीन गुणांची कमाई केली आहे.

मॉस्को येथील स्पार्टक स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत रोनाल्डो, पेपे आणि बेर्नाडो सिल्व्हा या पोर्तुगालच्या त्रिकुटाकडे चाहत्यांचे लक्ष असेल. मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत रोनाल्डो वगळता दोन्ही प्रमुख खेळाडूंची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नव्हती. त्यात बचावफळीतील खेळाडू गाफील राहिल्यामुळे पोर्तुगालला अखेरच्या क्षणी गोल पत्करावा लागला आणि मेक्सिकोने हा सामना २-२ असा बरोबरीत सोडवला. या सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान पोर्तुगालसमोर असणार आहे. पहिल्या लढतीत अ‍ॅड्रे गोमेज आणि अ‍ॅड्रियन या पोर्तुगालच्या खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवण्यात आले होते आणि रशियाविरुद्धही त्यांना कार्ड दाखवले, तर त्यांच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रशिक्षक फेर्नाडो सँटोस त्यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रशियाच्या संघाला बारावा खेळाडू म्हणून प्रेक्षकांचा मिळणारा पाठिंबा हा पोर्तुगालची डोकेदुखी वाढवू शकतो. न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून गटात अव्वल स्थानी विराजमान असलेल्या रशियाला प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखणे महागात पडू शकते. पोर्तुगालकडे अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत आणि ते कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतात, याची कल्पना यजमानांना आहे. गोलरक्षक इगोर अ‍ॅकिंफिव्ह, मध्यरक्षक डेनिस ग्लुशाकोव्ह आणि आघाडीपटू फ्लॉडर स्मोलोव्ह हे यजमानांचे प्रमुख अस्त्र आहेत. अ‍ॅकिंफिव्हचा हा शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना असल्यामुळे त्याला विजयी भेट देण्यासाठी खेळाडूंनी मोट बांधली आहे. मॉस्को येथील स्टेडियमवर पोर्तुगाल आणि रशिया यांच्यात तीन सामने झाले असून त्यात यजमानांनी बाजी मारली आहे.  इतिहास रशियाच्या बाजूने असला तरी पोर्तुगाल विजयासाठी आतुर आहे.

मेक्सिको-न्यूझीलंड समोरासमोर

सोची : कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत बुधवारी मेक्सिको आणि न्यूझीलंड हे समोरासमोर येणार आहेत. सोची येथील फिष्ट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या लढतीत दोन्ही संघांवर प्रचंड दडपण असणार आहे. या लढतीतून उपांत्य फेरीच्या शर्यतीतून कोणता संघ बाद होईल, हे निश्चित होणार असल्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी कडवा संघर्ष देतील. त्यात न्यूझीलंडला येथे पराभव पत्करावा लागल्यास त्यांचे आव्हान संपुष्टातच येणार आहे.

आजचे सामने

पोर्तुगाल वि. रशिया

  • वेळ : रात्री ८.३० वाजल्यापासून

मेक्सिको वि. न्यूझीलंड

  • वेळ : रात्री ११.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि टेन २.