एखादी मोठी स्पर्धा घडत असताना त्याबद्दल सर्वच ठिकाणी लिहिलं जातं आणि ते आवडीनं वाचलही जातं, त्यामध्येच जर तो क्रिकेट विश्वचषक असेल तर वाचकांच्या त्यावर उडय़ा पडतात. पण स्पर्धा झाल्यावर मात्र त्याला जास्त कोणी विचारत नाही, ती रद्दी झालेली असते. पण काही गोष्टींचा त्याला अपवाद असतो. जर शैली, शब्द, भाषा चांगली असेल तर ते लेख पुन्हा पुन्हा वाचले जातात, असंच काहीसं घडतं जेव्हा तुम्ही क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे ‘पॉवर प्ले’ हे पुस्तक हातात पडते.
२०११चा विश्वचषक म्हणजे भारताला तब्बल २८ वर्षांनी पडलेलं सुवर्ण आणि अविस्मरणीय असं स्वप्न. वर्तमानपत्रातील बातम्या किंवा लेख वाचक जपून ठेवत नाहीत, पण त्यानंतर त्यांना हे लेख वाचायला आवडतात. स्वप्न पुन्हा पुन्हा जगायला आवडतं. त्यामुळे क्रिकेट विश्वचषकादरम्यान संझगिरी यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखांचं हे पुस्तक एक विलक्षण आनंद देऊन जातं.
आपल्या लेखात त्यांनी चुकीच्या गोष्टींवर टीका केली आहे आणि चांगल्या गोष्टींचं कौतुकही. त्यांच्या उपमा, शैली आणि भाषेवरचं प्रभुत्व वाचकाला लेखाच्या डोहात गुरफटून टाकतं. पण एकाच गोष्टीवरचे लेख विविध वर्तमानपत्रात लिहील्यामुळे काही ठिकाणी वाचताना साम्य वाटतं, पण ही गोष्ट सोडल्यास पुस्तक वाचताना विश्वचषकाचे वातावरण जीवंत होते, डोळ्यापुढे तरळून जाते.
संझगिरींनी लिहीलेल्या ‘पॉवर प्ले’मध्ये त्यांनी ‘पॉवर फुल्ल’ अशी बोलंदाजी केलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला विश्वचषकाच्या स्वप्नांचा ‘रीप्ले’ अनुभवायचा असेल, तर हे पुस्तक वाचल्यास ती कसूर नक्कीच भरून निघेल.
पुस्तकाचे नाव : पॉवर प्ले
लेखक : द्वारकानाथ संझगिरी
प्रकाशक : विद्या विकास पब्लिशर्स, नागपूर
किंमत : २७५ रुपये फक्त.