४४-वर्धापनदिन विशेष अंक

आविष्कार देशमुख, अविनाश पाटील, तानाजी काळे, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे, सचिन कांकरिया, सतीश कामत, संतोष विणके

मुलींनी खेळायचे ते टिपरीपाणीसारखे नाजूक खेळ आणि मुलांनी खेळायचे ते अंगातली रग जिरवणारे खेळ ही पारंपरिक समजूत मुलींनी केव्हाच धुडकावून लावली आहे. अलीकडच्या आलेल्या ‘दंगल’ सिनेमाने ते अधोरेखित केलं इतकंच. म्हणूनच ‘लोकप्रभा’ने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या खेळांमधल्या ‘गीता-बबिता फोगट’चा शोध घेतला. त्यातून दिसलेलं चित्र निश्चितच आशादायी आहे. मुलींमध्ये क्रीडा क्षेत्रात पाय रोवून उभं राहण्याची इच्छा आहे, पालकांचं सहकार्यही आहे. आता गरज आहे ती क्रीडा संस्कृती विकसित होण्याची.

05-women-sportperson

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ‘पॉवरलििफ्टग’ खेळ प्रकारात महिला अपवादानेच शिरतात. मात्र नागपूरकन्या अलफियाने ते धाडस केले. स्वत:च्या गुणवत्तेवर विश्वास आणि अथक मेहनत करायची तयारी हे ध्येय उराशी बाळगून अलफियाने या क्षेत्रामध्ये आपले ‘वजन’ निर्माण करण्याचे ठरविले. कोणाचेही पाठबळ नसताना १९ वर्षीय अलफियाने छोटय़ामोठय़ा स्पध्रेतच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारून एकूण २९ सुवर्णपदकांची कमाई केली. मात्र घरची बेताची परिस्थिती आणि राज्य शासनाकडून घेतली न जाणारी कामगिरीची दखल यामुळे अलफियाला आज महाविद्यालयीन शिक्षणासोबतच खासगी व्यायामशाळेत नोकरी करण्याची वेळ आली आहे.

प्रतिभावान खेळाडू अलफियाच्या वाटय़ाला अगदी लहानपणापासून संघर्ष आला. तिचा हा संघर्ष आजतागायत सुरूच आहे. तिच्या कुटुंबात वडील हारुल, आई मलिका आणि आजरा, आलिया व अमरिन या तीन बहिणी आहेत. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या तिच्या वडिलांवर हृदयविकाराच्या धक्क्यानंतर घरीच किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. आई गृहिणी असून आजराचे लग्न झाले आहे. घरात सर्वात लहान असलेली अलफिया सध्या सक्करदरा येथील नागजी महाराज शारीरिक शिक्षण महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिक्षण घेत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मानाचा तुरा रोवणाऱ्या अलफियाची अद्यापही सरकार, प्रायोजक वा क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी दखल घेतलेली नाही. प्रत्येक स्पध्रेत सहभागी होण्यासाठी आकारले जाणारे भरमसाट शुल्क, सराव आणि डाएटवर होणारा मोठा खर्च यासाठी तिला पदरमोड करावी लागते. गेल्या पाच वर्षांपासून ती प्रतापनगर येथील खासगी व्यायामशाळेत नोकरी करून खेळातली तिची कामगिरी बजावीत आहे. मात्र, अद्यापही तिच्याकडे सरकारचे लक्ष गेलेले नाही. व्यायाम करण्याच्या इच्छेने व्यायामशाळेत गेलेली अलफिया ‘पॉवरलििफ्टग’ या खेळाकडे आकर्षति झाली. अगदी सुरुवातीपासून लहान-मोठय़ा स्थानिक पातळीवरील स्पर्धा जिंकणाऱ्या अलफियाने अल्पावधीतच राष्ट्रीय व राज्य स्पर्धात मानाचे किताब पटकावले. स्थानिक स्पर्धासह राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये अलफियाने सुवर्णपदकेच जिंकली आहेत, हे विशेष.

स्ट्राँगेस्ट टीन गर्ल ऑफ इंडिया’

नोव्हेंबर-२०१६ ला दिल्ली येथे ‘फिट लाइन इंटरनॅशनल एक्स्पो’मध्ये सुवर्णपदक अलफियाने मिळवले. त्यानंतर डिसेंबरमध्ये ठाण्यात झालेल्या पश्चिम विभागीय ‘पॉवरलििफ्टग’मध्येही तिने सुवर्ण खिशात घातले. या स्पध्रेनंतरच नॅशनल पॉवर लििफ्टग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावीत ‘स्ट्राँगेस्ट टीन गर्ल ऑफ इंडिया’चा तिने मान पटकाविला. ती भारतातील कमी वयाची पहिली ‘पॉवरलिफ्टर’ ठरली आहे. तिने ५६ किलो वजनगट सब ज्युनिअर, ११० किलो वजनगट स्क्व्ॉट प्रकार, ज्युनिअर ५५ किलो वजनगट बेंच प्रेस आणि १४५ किलो वजनगट डेडलिफ्ट आदी स्पर्धात सहभागी होत ३१० किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

अलफियाने ‘पॉवरलिफ्टर’ खेळातील स्कॉट, बेंच प्रेस व डेड लिफ्ट या क्रीडा प्रकारांत २९ सुवर्णपदके मिळवली. यात राष्ट्रस्तरीय स्पध्रेत १८, तर राज्य पातळीवर ११ सुवर्णपदकांचा समावेश असून तिने राज्याचे नाव उंचावले आहे. सलग तीन वेळा सब ज्युनिअर गटात ‘स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया’ व ‘स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र’ असे मानाचे किताब पटकावलेली अलफिया ही कमी वयात कामगिरी करणारी देशातील पहिली खेळाडू आहे. गिट्टीखदान परिसरातील दशरथ नगरात राहणाऱ्या अलफियाच्या घरी अठराविशे दारिद्रय़ असताना ती परिस्थितीशी झगडत नवनवे किताब पटकावत आहे. मात्र, या ‘पॉवरलिफ्टर’कडे सरकारच नव्हे, तर स्थानिक राजकारण्यांनीही दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

अलफिया सध्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक पातळीच्या स्पध्रेच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी पुढील महिन्यात तिला दिल्लीला पात्रता फेरी गाठायची आहे. घरात दारिद्रय़ असल्याने स्वत:च्या खेळासाठी लागणारा जवळपास ३० हजार रुपये महिना असा खर्च तिच्या आवाक्याबाहेरचा आहे. दोन सत्रांत नोकरी आणि दोन सत्रांत सराव करून अलफिया दोन्ही गोष्टींचा मेळ घालायचा प्रयत्न करते आहे. सध्या अलफिया नामांकित सौष्ठव रोहित शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. प्रत्येक स्पर्धा अलफियासाठी महत्त्वाची असते. त्यानुसार ती मेहनतही घेत आहे, अशी माहिती तिचे वडील हारुल शेख यांनी दिली. मुलांना जे खेळ आवडतात त्या खेळांमध्ये सहभागी व्हावे; परंतु दुर्दैवाने पशाअभावी इच्छा असूनही या क्रीडा प्रकाराकडे दुर्लक्ष करावे लागते. अशा खेळाडूंना समाजातील सेवाभावींनी आíथक साहाय्य करावे. शासनाकडूनही या खेळासाठी मदत व्हावी. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धामध्ये अलफियाने स्वत:च स्वत:चा खर्च उचलला. मात्र, परदेशवारीतील स्पर्धामध्ये शासनाची मदत मिळावी, अशी इच्छा तिची आई मलिका शेख यांनी व्यक्त केली.

सध्या अलफिया ही खासगी जिममध्ये महिला प्रशिक्षक म्हणून काम करीत आहे. पॉवरलिफ्टिंग या खेळाच्या सरावासाठीचे डाएट वेगळे असते. तिचा महिन्याच्या डाएटचा खर्च साधारण २५ ते ३० हजार असतो. मात्र, अर्धा खर्चही तिच्या वेतनातून भागत नाही. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जागतिक पातळीच्या स्पध्रेसाठी तिचा कसून सराव सुरू आहे. जागतिक पातळीवरील स्पध्रेत एक वैशिष्टय़पूर्ण पोशाख घालावा लागतो. तो तिच्याजवळ नाही. त्या पोशाखाची किंमत ५० हजारांहून अधिक आहे. त्या पोशाखामुळे वजन पेलण्याची क्षमता वाढते. त्यासाठी आíथक हातभारासोबतच समाजानेही तिच्या पाठीशी उभे राहण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.

पॉवरलििफ्टग या खेळाकडे क्रीडा संघटनांचे दुर्लक्ष होते. नावापुरत्या होणाऱ्या स्पर्धामध्येही बक्षिसे नाममात्र मिळतात. पर्यायाने खेळाडूंचे या खेळाबद्दलचे आकर्षण कमी होत आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून या खेळाच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे.

‘‘देशासाठी २९ सुवर्णपदके आणूनदेखील माझी दखल कोणीच घेतली नाही, याचे दु:ख वाटते. आज मला प्रायोजक मिळत नाहीत. स्पध्रेसाठी विदेशात जाण्याचा खर्च, दैनंदिन खर्च यासाठी शासनाने हातभार लावणे अपेक्षित आहे. यंदा दिल्ली येथे ऑक्टोबर महिन्यात जागतिक पातळीची स्पर्धा आहे अन् या स्पध्रेत मला चॅम्पियन बनायचे आहे. त्या दृष्टीने माझा सराव सुरू आहे. इतर देशांत स्पर्धा झाल्या तर त्याची प्रसिद्धी या खेळाला विशेष मिळत नाही. मात्र भारतात जर मी चांगली कामगिरी केली तर त्याचा सकारात्मक फायदा मला होऊ शकतो.’’ – अलफिया

कर्ज घेऊ पण मागे वळणार नाही

अलफिया सध्या दिल्ली येथे होऊ घातलेल्या जागतिक पातळीच्या स्पध्रेसाठी तयारीला लागली आहे. आतापर्यंत तिची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली असली तरी कोणीच तिच्या सुवर्णभरारीची दखल घेतली नाही याचे फार वाईट वाटते. दहा तास नोकरी करून ती सराव करते. तिला स्वत:च्या सरावासाठी हवा तेवढा वेळ देता येत नाही. घरची आíथक स्थिती फारशी चांगली नसल्याने डाएटसाठी लागणारा खर्च अलफियाला झेपत नाही. तरीही आम्ही मागे न फिरता बँकेतून कर्ज घेण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचेच असूनदेखील येथील दर्जेदार खेळाडूंची दखल घेतली जात नाही याबद्दल वाईट वाटते. पुढील ध्येय डोळ्यासमोर ठेवून अलफिया दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पातळीच्या स्पध्रेत पहिल्या तीनमध्ये नक्की राहील असा मला विश्वास आहे.
रोहित शाहू, अलफियाचे प्रशिक्षक

आविष्कार देशमुख – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा