कोलकाता येथील ईडन गार्डन्सवरील खेळपट्टीचे क्युरेटर प्रबीर मुखर्जी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर जाहीर टीका केल्याने स्वत:ला वादाच्या भोवऱ्यात ओढवून घेतले आहे.
ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीस अनुकूल करण्याची विनंती धोनी याने केली होती मात्र मुखर्जी यांनी ही विनंती अमान्य करीत धोनीवर जाहीर टीका केली होती. कोणत्याही कर्णधाराच्या मनाप्रमाणे खेळपट्टी तयार केली जात नाही असे मुखर्जी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यांची ही टीका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमावलीचे उल्लंघन असल्याचे सांगून मंडळाचे उपाध्यक्ष निरंजन शहा म्हणाले, मुखर्जी यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजपर्यंत कोणत्याही क्युरेटरने प्रसारमाध्यमांना अशी मुलाखत दिलेली नाही. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी नेमके काय बोलायचे हेही मंडळाने सर्व क्युरेटरांना कळविले आहे.
जेव्हा मंडळाने खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी पूर्व विभागाच्या प्रतिनिधीला कोलकाता येथे पाठविले असताना मुखर्जी यांनी वैद्यकीय रजेवर जाण्याचीही धमकी दिली होती. मुखर्जी यांनी म्हटले होते की, कोणाही एका व्यक्तीच्या आदेशानुसार खेळपट्टी केली जात नाही. आजपर्यंत मी असे कृत्य कधीही केलेले नाही. जर धोनी याने लेखी आदेश दिला तर आपण त्याच्या मतानुसार खेळपट्टी   करण्यास तयार आहोत.