शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे सुरू असलेल्या ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रकाश नानजप्पाला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब मिळाला. राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या कर्नाटकच्या प्रकाशला ५० हजारांच्या बक्षीस रकमेने सन्मानित केले.
महाराष्ट्राच्या शीतल थोरातने १९९ गुणांसह महिलांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर कब्जा केला. पंजाबच्या हरवीन साराओने १९७.३ गुणांसह रौप्य तर उत्तराखंडच्या प्रेरणा गुप्ताने १७३.९ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. सांघिक प्रकारात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पुष्पांजली राणा, रचना देवी आणि साक्षी दागर यांनी अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राला रौप्य तर हरयाणाला कांस्यपदक मिळाले.
१० मीटर पिस्तूल कनिष्ठ प्रकारात हरयाणाची यशस्विनी देसवाल सुवर्णपदकाची मानकरी ठरली. उत्तराखंडची प्रेरणा गुप्ताने रौप्य तर ममता केडिआने कांस्यपदकावर नाव कोरले. सांघिक गटात हरयाणानेच सुवर्णपदकावर कब्जा केला. महाराष्ट्राने रौप्य व मध्य प्रदेशला कांस्यपदक पटकावले.
१० मीटर पिस्तूल युवा प्रकारातही हरयाणानेच वर्चस्व राखताना सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली. यशस्विनीने सुवर्ण, नयनी भारद्वाजने रौप्यपदक मिळवले. आंध्र प्रदेशच्या फतीमा देसावालाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सांघिक प्रकारात हरयाणानेच बाजी मारली. मध्य प्रदेशने रौप्य तर महाराष्ट्राने १०७९ कांस्यपदक पटकावले.