मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी साकारणारा कल्याणचा प्रणव धनावडे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. प्रणवने परीक्षेत ६१ टक्के गुण मिळवले आहेत. क्रिकेटच्या मैदानासोबतच अभ्यासात देखील प्रणवची कामगिरी चांगली असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रणवच्या कुटुंबियांनी त्याच्या या यशावर आनंद व्यक्त केला.

विक्रमादित्य प्रणव!

प्रणवने जानेवारी महिन्यात झालेल्या भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत(१६ वर्षाखालील) के.सी.गांधी संघाकडून खेळताना १२९ चौकार आणि ५९ षटकार ठोकत नाबाद १००९ धावांची खेळी साकारली होती. प्रणवच्या या खेळीच्या जोरावर के.सी.गांधी संघाने प्रतिस्पर्धी संघासमोर ३ बाद १४६५ धावांचा डोंगर उभा केला होता. सचिन तेंडुलकरनेही प्रणवच्या या ऐतिहासिक खेळीची दखल घेतली होती. सचिनने प्रणवचे तोंडभरुन कौतुक केले होते, तर एमसीएकडून प्रणवला दरमहा दहा हजारांची शिष्यवृत्ती देखील जाहीर करून त्याचा सन्मान केला होता.