केरळच्या एच. एस. प्रणॉयने बी. साईप्रणीथचे आव्हान सरळ दोन गेम्समध्ये मोडून काढले आणि दाजीसाहेब नातू चषक अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष गटात विजेतेपद मिळविले. त्याचीच सहकारी पी. सी. तुलसी हिने अजिंक्यपद राखताना महाराष्ट्राच्या तन्वी लाड हिला हरविले.
मॉडर्न क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत प्रणयने ४१ मिनिटांच्या लढतीत साईप्रणीत याचा २१-१९, २१-१७ असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये ८-११ अशा पिछाडीवरून त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत १३-१३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर १९-१९ पर्यंत सतत बरोबरी राहिली होती. प्रणयने सलग दोन गुण घेत ही गेम मिळविली. दुसऱ्या गेममध्ये विलक्षण चुरस पाहावयास मिळाली. दोन्ही खेळाडूंनी ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला. १६-१६ अशा बरोबरीनंतर प्रणयने खेळावर नियंत्रण मिळविले. ही गेम घेत त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यंदाचे त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने कोची येथील अखिल भारतीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
सामना संपल्यानंतर प्रणयने सांगितले की, ‘‘अंतिम सामना जिंकण्याची मला खात्री होती. यापूर्वी मी साईला हरविले आहे. तथापि त्याने येथे चांगली लढत दिली. पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली मी २०१६ साली होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.’’
महिलांमध्ये तुलसी हिने तन्वी लाड हिचा २१-१९, २१-१२ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. पहिल्या गेममध्ये स्मॅशिंगचा वेगवान खेळ करीत तुलसीने ११-७ अशी आघाडी घेतली. तथापि जिगरबाज तन्वी हिने स्मॅशिंगचा कल्पकतेने उपयोग करीत १२-१२ अशी बरोबरी साधली. मात्र पुन्हा तुलसीने खेळावर नियंत्रण मिळवीत आपली आघाडी कायम राखली. ही गेम तिने २१-१९ अशा फरकाने घेतली.
दुसऱ्या गेममध्ये तन्वी हिला अपेक्षेइतकी झुंज देता आली नाही. सुरुवातीच्या तीन गुणांच्या आघाडीनंतर तुलसीने हळूहळू ही आघाडी वाढवीत दुसरी गेम जिंकून विजेतेपदावर मोहोर नोंदविली. या मोसमातील तिचे हे दुसरे विजेतेपद आहे. याआधी तिने बरेली येथील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते.
तुलसीला वेध ऑलिम्पिक तिकिटाचे
राष्ट्रीय क्रमवारीत मी सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. आगामी आशियाई स्पर्धेतील एकेरीत मला संधी मिळाली नसली, तरी सांघिक लढतीत भाग घेण्याची मला संधी मिळाली आहे. येथील अनुभवाचा फायदा मला रिओ ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धासाठी होणार आहे व ऑलिम्पिकमध्ये मी भारताचे प्रतिनिधित्व करीन, असा आत्मविश्वास तुलसी हिने व्यक्त केला.  
महिलांच्या दुहेरीत प्रज्ञा गद्रे व एन.सिकी रेड्डी यांनी विजेतेपद मिळविताना जे.मेघना व के.मनीषा यांच्यावर २१-१४, २१-११ अशी मात केली. पुरुष दुहेरीत मनु अत्री व सुमेध रेड्डी यांनी अल्विन फ्रान्सिस व अरुण विष्णु यांच्यावर १५-२१, २१-१४, २१-१५ असा विजय मिळवीत अजिंक्यपद पटकाविले. मिश्र दुहेरीत मनु अत्री याने सिकी रेड्डी हिच्या साथीत अरुण विष्णु व अपर्णा बालन यांना २१-१९, २१-१७ असे हरविले. विजेत्यांना खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.