महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याची रिओ ऑलिम्पिकची वारी हुकल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय कुस्ती महासंघाकडून नरसिंगऐवजी प्रवीण राणा याची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत नरसिंग यादव दोषी आढळला होता. मात्र, आपल्याविरुद्ध कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप करत नरसिंगने याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, कुस्ती महासंघाकडून नरसिंगऐवजी प्रवीण राणाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे नरसिंगचे स्वप्न भंगले आहे.

भारताला कुस्तीमध्ये नरसिंग यादवकडून पदकाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आता  ७४ किलो वजनी गटात प्रवीण राणा नरसिंगची उणीव भरून काढणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेत २०१४ साली झालेल्या डेव्ह स्कल्टझ स्मृती स्पर्धेत पटकावलेले सुवर्ण पदक ही प्रवीण राणाच्याबाबतीतील एकमेव जमेची बाब आहे.

काही दिवसांपूर्वी रिओ ऑलिम्पिकला सुशीलकुमार जाणार की नरसिंग यादव यावरुन चढाओढ सुरु होती. अखेर न्यायालयाने नरसिंगच्या बाजूने कौल दिल्यामुळे त्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर नरसिंग याने सुशील कुमारचे प्रशिक्षक आणि सासरे सत्पाल सिंग यांच्यावर कारस्थान रचल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नरसिंग यादव भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडून न्याय मिळण्याच्या प्रतिक्षेत होता.
पुराव्याविना दोषारोप करणे चुकीचे -सत्पाल
विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पदक पटकावून ऑलिम्पिकचा कोटा मिळवणारा नरसिंग हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय कुस्तीपटूला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवून ऑलिम्पिकचा कोटा मिळवता आलेला नाही. नाडा अर्थात नॅशनल अॅण्टी डोपिंग असोसिएशनने सोनिपतमधल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत ५ जुलै रोजी चाचणी केली होती. यामध्ये नरसिंग यादव दोषी आढळला होता.