ध्रुव सुनीश व परीन शिवेकर या दोन्ही मुंबईच्या खेळाडूंनी २६ व्या प्रवीण चषक अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावीत कौतुकास्पद कामगिरी केली. ही स्पर्धा हिलसाइड जिमखानाने आयोजित केली होती.
मुंबईच्या फ्लोरेन्स प्रशालेत शिकणाऱ्या ध्रुवने १४ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत पुण्याच्या सिद्धांत बांठिया याच्यावर मात केली. अटीतटीने झालेल्या लढतीत त्याने हा सामना ६-१, ६-७ (५-७), ६-३ असा जिंकला. सामन्यातील दुसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी असताना स्वत:च्या सव्‍‌र्हिसवर विजेतेपद मिळविण्याची संधी त्याला साधता आली नाही. सिद्धांतने दोन मॅचपॉइन्ट वाचवीत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. हा सेट टायब्रेकरवर गेला. तेथेही ध्रुवकडे ५-३ अशी आघाडी होती मात्र सिद्धांतने बॅकहँडच्या परतीच्या सुरेख फटक्यांचा उपयोग केला. त्याने टायब्रेकर घेत दुसरा सेट मिळविला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र ध्रुवने खेळावर नियंत्रण राखले आणि हा सेट सहज जिंकून विजेतेपद मिळविले. त्याने दुहेरीत सिद्धांतच्याच साथीत अजिंक्यपद मिळविले होते.
मुलांच्या १२ वर्षांखालील गटात इंदूर येथील टेनिस अकादमीचा खेळाडू टेरेन्स दास विजेता ठरला. त्याने अंतिम लढतीत सिद्धांतलाच पराभूत केले. हा सामना त्याने २-६, ६-३, ७-५ असा जिंकला. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके असा सुरेख खेळ करीत विजयश्री खेचून आणली. १० वर्षांखालील गटात आदित्य श्रीराम याने अजिंक्यपद मिळविले. त्याने अंतिम फेरीत एहान शहा याला ६-४ असे नमविले.
मुलींच्या १४ वर्षांखालील गटात मुंबईच्या परीन शिवेकर हिने अंतिम लढतीत आपलीच सहकारी दक्षता पटेल हिच्यावर ७-६ (७-३), ७-६ (७-१) अशी मात केली. दोन्ही सेटमध्ये तिला दक्षताने कौतुकास्पद लढत दिली. दोन्ही खेळाडूंनी परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. दोन्ही सेट टायब्रेकपर्यंत रंगतदार झाले. त्यामध्ये मात्र परीन हिने दक्षतास फारशी संधी दिली नाही. परीन हिने दुहेरीत मोक्षा ठुकराल हिच्या साथीत विजेतेपद मिळविले होते. त्या वेळी अंतिम सामन्यात त्यांनी साई दीपेया (हैदराबाद) व दक्षता पटेल यांना हरविले होते. १२ वर्षांखालील गटात दीपेया हिने विजेतेपद मिळवीत संमिश्र यश मिळविले. तिने अंतिम लढतीत अनयाकुमारी हिचा ६-१, ६-३ असा पराभव केला.
मुलींच्या १० वर्षांखालील गटात पुण्याची शरण्या गवारे विजेती ठरली. सिम्बायोसिस प्रशालेच्या या खेळाडूने अंतिम फेरीत मुंबईच्या दुर्वा देव हिच्यावर ६-२ असा एकतर्फी विजय मिळविला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र बँकेचे सरव्यवस्थापक पी.एन.देशपांडे यांच्या हस्ते झाला. या वेळी महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष राजकुमार चोरडिया व हिलसाइड जिमखानाचे विश्वस्त जालमचंद पारेख हेही या वेळी उपस्थित होते.