क्रिकेटेतर क्रीडापटूंसाठी ऑलिम्पिक हे सर्वोच्च व्यासपीठ. देशाप्रती सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची संधी याच सोहळ्याच्या माध्यमातून मिळते, मात्र ऑलिम्पिकपूर्वी सामोरे जावे लागणाऱ्या प्रश्नांमुळे खेळाडूंच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, असे मत नेमबाज हीना सिद्धूने व्यक्त केले. हीनाने नुकतेच एअर पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी कब्जा केला. ती पुढे म्हणते, ‘ऑलिम्पिक शिकण्याची प्रक्रिया आहे. हे केवळ नेमबाजीपुरते मर्यादित नाही. खूप साऱ्या गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. खेळाडूंवर मोठय़ा प्रमाणावर दबाव असतो. आणि या दबावामुळेच खेळाडूंची एकाग्रता भंग पावते. माझ्याकडे ऑलिम्पिकवारीचा अनुभव आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकसाठी मी अधिक चांगल्या प्रकारे तयारी करू शकेन.’ क्रमवारीतील अव्वल स्थान, पदके, सर्वाधिक गुण यापेक्षाही सर्वोत्तम कामगिरीला प्राधान्य असेल. खेळात सातत्याने सुधारणा करण्याला महत्त्व आहे, असे तिने स्पष्ट केले.