पृथ्वी शॉ, भारताच्या युवा क्रिकेट संघाचा कर्णधार

भारताचे माजी खेळाडू व युवा संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सकारात्मकतेची शिकवण आयुष्यभरासाठी अत्यंत मोलाची ठरत आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याने व्यक्त  केली.

एखादी जबाबदारी किंवा पद सांभाळताना अपेक्षेनुसार प्रदर्शन न केल्यास तुमच्यावरील दडपण वाढते. पण अशा वेळी खचून जाण्यापेक्षा सकारात्मकतेने त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहिजे, हाच धडा १७ वर्षीय पृथ्वीने द्रविडकडून घेतला आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी पहिल्यांदाच भारताच्या युवा संघाचे नेतृत्व करणाऱ्या पृथ्वीशी या आव्हानाबाबत केलेली खास बातचीत-

प्रशिक्षक द्रविड यांच्या मार्गदर्शनाचा तुला कारकीर्दीमध्ये कशा प्रकारे फायदा होत आहे?

द्रविड यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. एखाद्या सामन्यात मी वाईट खेळलो किंवा चुकीचा फटका मारून बाद झालो तरी ते कधीच रागावत नाहीत, उलट प्रेमाने ते मला माझी चूक लक्षात आणून देतात. सकारात्मक विचार केला की सर्व काही सकारात्मक घडते अशी त्यांची शिकवण माझ्यासाठी खूप मोलाची आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्या खेळात सुधारणा होत असून माझी फलंदाजी तंत्रशुद्ध बनते आहे. त्यांच्यासारखे प्रशिक्षक मिळणे, हे आम्हा सर्वाचेच भाग्य आहे.

भारताच्या युवा संघाच्या कर्णधारपदी तुझी निवड झाली आहे. या आव्हानाकडे तू कसे पाहतो आहेस?

कोणत्याही संघाचे कर्णधार होणे ही खेळाडूसाठी अभिमानास्पद गोष्ट असते. परंतु देशाच्या युवा संघाचा कर्णधार होणे म्हणजे माझ्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी आहे. जबाबदारी स्वीकारायला मला नेहमीच आवडते. आलेल्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जात यश प्राप्त करणे, हेच मी माझ्या आयुष्यात शिकलो आहे. याआधी मी शालेय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये कर्णधारपद सांभाळले आहे. भारताच्या युवा संघाचे कर्णधारपद असो किंवा मुख्य भारतीय संघाचे थोडेसे दडपण असतेच. परंतु मला माझ्या क्षमतेवर विश्वास असल्यामुळे नेतृत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे.

संघातील समन्वयाबाबत कर्णधार म्हणून तुझा दृष्टिकोन काय आहे?

समन्वयासाठी काही विशेष करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते. संघातील सर्व खेळाडूंना आपापल्या खेळाची व जबाबदारीची जाणीव आहे. सराव आणि फावल्या वेळेप्रसंगी आम्ही जितके शक्य होईल, तितके एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो. खेळाडूंमध्ये असलेले खेळीमेळीचे वातावरण पाहून मलाही कर्णधार म्हणून नक्कीच आनंद होतो.

रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्यात सामन्यात झळकावलेल्या शतकाने तुला कशा प्रकारे प्रेरणा दिली?

माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतील काही खास खेळींमध्ये हिचा नक्कीच समावेश असेल. तामिळनाडूविरुद्धच्या त्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना केलेली शतकी खेळी संस्मरणीय ठरली. सामन्याच्या काही दिवस अगोदपर्यंत मला माहीतही नव्हते की मला रणजी क्रिकेटमध्ये खेळायची संधी मिळेल. मात्र आशिया चषक युवा स्पध्रेत उत्तम कामगिरी केल्यामुळे माझी मुंबईच्या रणजी संघात निवड करण्यात आली. खरे तर ९९ धावांवर असताना मी बाद झालो असतो, पण गोलंदाजाच्या चुकीमुळे बचावलो. त्या शतकाने माझा आत्मविश्वास मोठय़ा प्रमाणात वाढवला.

इंग्लंडमधील खेळपट्टय़ांकडे तू कशा रीतीने पाहतो आहेस?

इंग्लंडमधील खेळपट्टय़ा वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन असतात. पण या खेळपट्टय़ांवर चेंडू उत्तम प्रकारे बॅटवर येतो. त्यामुळेच तिथे फलंदाजी करायला मला विशेष आवडते. चेंडू स्विंग होणाऱ्या परिस्थितीत फलंदाजी करणे अवघड असते. अशा वेळी तुम्ही जितका स्वत:ला वेळ द्याल, तितके बरे असते. समीर पाठक यांच्या प्रयत्नांमुळे २०१२ मध्ये दोन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर मला जाण्याची संधी मिळाली होती. त्या संधीचा मी पुरेपूर फायदा उचलला.

सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कमालीची चुरस आहे, याविषयी तुझ्या काय योजना आहेत?

भारताच्या मुख्य संघात स्थान मिळवणे हे साहजिकच प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. सध्या तरी मी फक्त आगामी इंग्लंड दौऱ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर २०१८ मध्ये युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धासुद्धा होणार आहे. मिळालेल्या संधीचे सोने करणे, हाच मंत्र मी जपला आहे. जर माझी कामगिरी सातत्याने चांगली होत राहिली, तर भारतीय संघाचे दार माझ्यासाठी लवकरच उघडले जाईल, अशी आशा आहे.