राजधानीत आजपासून प्रो कबड्डीचा लिलाव; मनजीत, राकेश, मोहित यांच्यासह काशिलिंग, नितीन यांच्याबाबत उत्सुकता

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या समाप्तीनंतर आता देशाच्या राजधानीत सोमवारी होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या पर्वाच्या लिलावाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात राकेश कुमारवर पाटणा पायरेट्सची १२ लाख ८० हजार रुपयांची सर्वाधिक बोली लागली होती. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या चौथ्या हंगामाच्या लिलावात पकडपटू मोहित चिल्लरवर विक्रमी ५३ लाख रुपयांची बोली बेंगळूरु बुल्सने लावली होती. तीन वर्षांत प्रो कबड्डीमध्ये लक्षवेधी उलाढाली झाल्या आहेत. यंदा क्रिकेटला मागे टाकत संघांची संख्यासुद्धा १२ होत आहे. त्यामुळे सर्वाधिक बोली कोणत्या कबड्डीपटूवर लागणार, याची क्रीडा क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे.

अ विभागात मनजीत चिल्लर, राकेश कुमार, जसवीर सिंग, अजय ठाकूर, राजेश नरवाल, शब्बीर बापू, सुरेंदर नाडा, संदीप नरवाल, मोहित चिल्लर यांच्या बोलीकडे सर्वाचे लक्ष असेल. या विभागात काशिलिंग आडके, नितीन मदने, रिशांक देवाडिगा, सचिन शिंगार्डे, गिरीश इर्नाक, विशाल माने, नीलेश शिंदे, महेंद्र रजपूत या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश आहे.

जयपूर पिंक पँथर्सचा माजी कर्णधार आणि विश्वचषक कबड्डी स्पध्रेत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या नवनीत गौतमचा ब विभागात समावेश करण्यात आला आहे. ब विभागात प्रशांत चव्हाण, संकेत चव्हाण, बाजीराव होडगे, विकास काळे, नीलेश साळुंखे, महेंदर सिंग, सुनील लांडे, आनंद पाटील, सुल्तान डांगे या महाराष्ट्राच्या खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले आहे.

प्रो कबड्डीच्या लिलावासाठी चारशेहून अधिक खेळाडू उपलब्ध असून, १६ देशांमधील ६२ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा यात समावेश करण्यात आला आहे. मागील हंगामात यू मुंबाकडून प्रभाव दाखवणाऱ्या इराणच्या फझल अत्राचाली या एकमेव खेळाडूचा अ विभागात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ब विभागात हादी ओश्तोरॅकचा (इराण) समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या हंगामाला संघमालक सावधतेने सामोरे गेले होते; परंतु आता चार हंगामांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे सर्व संघांचे व्यवस्थापन मंडळ खेळाडूंचा अभ्यास करून व्यवस्थित संघबांधणी करू शकतील.

लिलावाची रूपरेषा

  • लिलावाला सामोरे जाण्यापूर्वीच आठपैकी सात संघांनी प्रत्येकी एकेक खेळाडू आपल्याकडे कायम ठेवला आहे. यात यांग कुन ली (बंगाल वॉरियर्स), आशीष कुमार (बेंगळूरु बुल्स), मेराज शेख (दबंग दिल्ली), प्रदीप नरवाल (पाटणा पायरेट्स), दीपक हुडा (पुणेरी पलटण), राहुल चौधरी (तेलुगू टायटन्स) आणि अनुप कुमार (यू मुंबा) यांचा समावेश आहे.
  • यंदाच्या हंगामातील उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा आणि तामिळनाडू या नव्या चार संघांना सर्वप्रथम एकेक खेळाडू निवडता येणार आहे. याकरिता अ, ब आणि क विभागांकरिता अनुक्रमे ३५ लाख, २० लाख आणि १२ लाख रुपये अशा मूळ किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. हा खेळाडू अ विभागातील असल्यास त्याला तितकाच भाव मिळेल, मात्र तो ब किंवा क विभागातील असल्यास संबंधित संघात सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूच्या दहा टक्के अधिक मानधनाची कमाई या दिग्गज खेळाडूची असेल.
  • दोन दिवस चालणाऱ्या या लिलावासाठी अ विभागाकरिता २० लाख, ब विभागाकरिता १२ लाख, क विभागाकरिता ८ लाख आणि ड विभागाकरिता ५ लाख रुपये अशा मूळ किमती आहेत.
  • प्रत्येक संघाला १८ ते २५ खेळाडूंना स्थान देता येणार आहे.
  • प्रत्येक संघाला ३ नव्या युवा खेळाडूंना स्थान देणे बंधनकारक असेल.
  • किमान २ ते ४ परदेशी खेळाडूंचा प्रत्येक संघात समावेश असेल.
  • प्रत्येक संघाला संघबांधणीसाठी ४ कोटी रुपये (कायम खेळाडूच्या मानधनासह) उपलब्ध असतील.

untitled-17