महिन्याभरापूर्वी मुंबईच्या एनएससीआय स्टेडियमवर प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या पर्वाला प्रारंभ झाला. सात शहरांमधील टप्पे पूर्ण करीत बंगळुरूमधील शेवटच्या टप्प्यामधील अखेरचा साखळी सामना या पर्वाच्या यशस्वीतेची पोचपावती देत होता. बंगळुरूच्या कांतिरावा इनडोअर स्टेडियमवरील कबड्डीरसिकांचा अभूतपूर्व उत्साह यजमान बंगळुरू बुल्सचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला. बंगळुरू संघाने बलाढय़ जयपूर पिंक पँथर्सवर ३०-२९ अशी अवघ्या एका गुणाने आश्चर्यकारक मात करून गुणतालिकेतील तिसऱ्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. बुधवारी झालेल्या अन्य लढतीत यु मुंबाने पुणे पलटणला ३६-३५ असे फक्त एका गुणाने पराभूत केले. उपांत्य फेरीत आता अव्वल स्थानावरील जयपूरची पाटणा पायरेट्शी तर यु मुंबाची बंगळुरू बुल्सशी लढत होणार आहे.
जयपूरने आपल्या दर्जाला साजेशा खेळाचे प्रदर्शन करीत मध्यंतराला १८-१४ अशी आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या सत्रात जयपूरवर लोण पडला आणि त्यानंतर सामन्यातील उत्कंठा वाढली. दीपक कुमार आणि अजय ठाकूर यांच्या चढायांनी बंगळुरूच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. जयपूरकडून मणिंदर सिंगने अप्रतिम खेळ करीत सर्वाची दाद मिळवली.
मुंबई-पुणे संघांची लढत अखेरच्या चढाईपर्यंत रंगली. पहिल्या सत्रात यु मुंबाने २३-२१ अशी आघाडी घेतली होती. परंतु उत्तरार्धात चढाया-पकडींची रंगत आणखी वाढली. शेवटच्या मिनिटाला रिशांक देवाडिगाची पकड करून पुण्याने ३५-३५ अशी बरोबरी साधली. मग अखेरच्या चढाईत वझीर सिंगची पकड करून मुंबाने अवघ्या गुणाने सामना जिंकला. मुंबईकडून अनुप कुमारने चढायांचे ८ आणि रिशांकने ७ गुण कमवले. तसेच सुरेंदर नाडाने (६ गुण) महत्त्वपूर्ण पकडींचे कौशल्य दाखवले.