राहुल, अनुप, मेराज, प्रदीपला सरासरी फक्त ५५ लाखांचे मानधन

प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामाच्या लिलावाने सात पट अधिक उंची गाठली आहे. नितीन तोमर, रोहित कुमार, मनजीत चिल्लर, सुरजीत सिंग आणि के. सेल्व्हामणी या कबड्डीपटूंना एकीकडे अपेक्षेपेक्षा उत्तम भाव मिळाला. मात्र लिलाव प्रक्रियेच्या नियमाचा आणि फ्रेंचायझींच्या कल्पक रणनीतीचा फटका अनुप कुमार, राहुल चौधरी, मेराज शेख आणि प्रदीप नरवाल यांना बसला आहे.

नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या लिलावामध्ये नितीन तोमरने (उत्तर प्रदेश) ९३ लाखांची बोली जिंकत अव्वल स्थान मिळवले. रोहित कुमार (बेंगळूरु बुल्स) आणि मनजीत चिल्लर (जयपूर पिंक पँथर्स) यांना अनुक्रमे ८१ लाख आणि ७५ लाख ५० हजारांची बोली लागली. याशिवाय सुरजीत सिंग (बंगाल वॉरियर्स) आणि के. सेल्व्हामणी (जयपूर पिंक पँथर्स) यांना प्रत्येकी ७३ लाखांचा भाव मिळाला. परंतु प्रो कबड्डी लीगच्या लिलावासाठी कायम राखलेल्या व प्राधान्यक्रमाने निवडलेल्या खेळाडूंबाबत केलेल्या नियमामुळे काही अव्वल खेळाडूंना मात्र तोटा सहन करावा लागणार आहे.

आतापर्यंतच्या हंगामांमध्ये आपल्या दमदार चढायांसह वर्चस्व गाजवणारा कबड्डीपटू राहुल चौधरीला फक्त ५३ लाख ९० हजार रुपयेच लिलावातून वाटय़ाला आले. कारण तेलुगू टायटन्सने सर्वाधिक किमतीची बोली नीलेश साळुंखेवर ४९ लाख रुपये लावली होती. प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी कर्णधार आणि भारताला गतवर्षी विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या अनुप कुमारला या लिलावातून यू मुंबा फक्त ५६ लाख ६५ हजार रुपये मानधन देणार आहे. कारण त्यांनी कुलदीप सिंगवर सर्वाधिक ५१ लाख ५० हजारांची बोली लावली होती. इराणचा अष्टपैलू खेळाडू मेराज शेखलाही फक्त ५७ लाख ७५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. कारण दबंग दिल्लीने सर्वाधिक किंमत सूरज देसाईवर (५२ लाख ५० हजार) मोजली होती. पाटणा पायरेट्सला सलग दोन विजेतेपदे जिंकून देण्यात चढाईपटू प्रदीप नरवालचा सिंहाचा वाटा होता. मात्र प्रदीपलाही लिलावप्रक्रियेतून फक्त ५५ लाख रुपये मिळणार आहेत. कारण त्यांची सर्वाधिक ५० लाखांची बोली जयदीपवर आहे. बेंगळूरु बुल्सने खेळाडू कायम ठेवताना ब विभागातील आशीष कुमारला स्थान दिले. आशीषला ५० लाख ६० हजार रुपये मानधन मिळणार आहे, कारण त्यांची या गटातील अव्वल बोली सचिन कुमारवर (४६ लाख) लागली होती. बेंगळूरुने अ विभागातील रोहित कुमारवर ८१ लाखांची बोली लावली. पण त्याचा कोणताही फायदा आशीषला होणार नाही. परदेशी खेळाडूंच्या अ विभागातील एकमेव खेळाडू फझल अत्राचालीला गुजरात ५५ लाख रुपये मानधन देणार आहे. कारण अबोझार मोहाजेर्मीघानीवर त्यांनी सर्वाधिक ५० लाखांची बोली लावली. हरयाणानेही अव्वल बचावपटू मोहित चिल्लरवरील बोली ४६ लाख ५० हजारांपर्यंत मर्यादित ठेवून प्राधान्याने निवड केलेल्या सुरेंद्र नाडाचे मानधन ५१ लाख १५ हजारांपर्यंत सीमित राखले आहे.

एकीकडे महत्त्वाच्या खेळाडूंना तोटा होत असताना पुणेरी पलटणचा दीपक हुडा (७२ लाख ६० हजार) आणि तामिळनाडू संघाच्या अजय ठाकूरला (६९ लाख ३० हजार) मात्र योग्य न्याय मिळाला आहे.

लिलाव प्रक्रियेत आधीपासून असलेल्या संघांसाठी एक खेळाडू कायम ठेवण्याची आणि नव्याने आलेल्या संघांसाठी एक खेळाडू प्राधान्याने निवडण्याची मुभा होती. मात्र त्याचे मानधन हे त्याच्या अ, ब किंवा क विभागातील सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूच्या मानधनाच्या दहा टक्के अधिक असणार होते. या नियमाचा कसोशीने अभ्यास करीत जयपूर पिंक पँथर्स आणि उत्तर प्रदेशने खेळाडू घेण्याचे टाळत सर्वच खेळाडू बोली लावत संघात घेतले. त्यामुळे सर्वाधिक ९३ लाखांची बोली उत्तर प्रदेशला नितीन तोमरवर लावल्यानंतरही राजेश नरवालसाठी ६९ लाखांची बोली लावता आली. जयपूरने मनजीत चिल्लरसाठी ७५ लाख ५० हजार मोजल्यानंतरही ७३ लाख रुपये के. सेल्व्हामणीवर खर्च केले.