घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दबंग दिल्लीने आपली निराशाजनक कामगिरी आजच्या सामन्यातही कायम ठेवली आहे. उत्तर प्रदेश योद्धाज संघाकडून आज दिल्लीला ४५-१६ अशा मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. रोहीत बलियानचा अपवाद वगळता सर्व दिल्लीच्या सर्व खेळाडूंनी आज सामन्यात निराशा केली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – तेलगू टायटन्सचा वादळी खेळ, जयपूर पिंक पँथर्स पराभूत

सुरुवातीपासून पिछाडीवर पडलेल्या दिल्लीने सामन्यात परतण्याचे प्रयत्नही केले नाहीत. अबुफजल मग्शदुलू, मिराज शेख यांना आजच्या सामन्यात केवळ ३ गुण मिळवता आले. उत्तर प्रदेशच्या बचावफळीने बाकीच्या वेळी दिल्लीच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात अडकवलं. दुसऱ्या सत्रात दिल्लीने आनंद पाटीलला संघात जागा दिली, मात्र त्यानेही निराशा केली. रोहीत बलियानने एकाकी झुंज देत सामन्यात ७ गुणांची कमाई केली. मात्र उत्तर प्रदेशच्या खेळापुढे त्याचे प्रयत्नही तोकडे पडले. बचावफळीत सतपालच्या ५ गुणांचा अपवाद वगळता दिल्लीच्या इतर खेळाडूंनीही निराशाच केली. त्यामुळे संपूर्ण सामन्यात दिल्लीचा संघ पिछाडीवर पडलेला दिसत होता.

याउलट उत्तर प्रदेशच्या संघाने आपला आक्रमक खेळ करत दिल्लीला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. नितीनने सामन्यात १५ गुणांची कमाई केली. दिल्लीच्या बचावफळीला सुरुंग लावण्याचं काम नितीने आजच्या चढाईत केलं. त्याला रिशांक देवाडीगा आणि सुरिंदर सिंहने प्रत्येकी ५-५ गुण मिळवत चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – सामना गमावला, गुजरातच्या प्रशिक्षकांची पंचांवर आगपाखड

उत्तर प्रदेशकडून बचावफळीत सागर कृष्णाने ५ तर नितीश कुमारने ४ गुणांची कमाई केली. जीवा आणि रोहित कुमार या खेळाडूंना आजच्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र दिल्लीच्या रोहीत बलियानवर अंकुश लावण्यात त्यांनी बजावलेली भूमिकाही महत्वाची होती. या विजयानंतर उत्तर प्रदेशचा संघ ‘ब’ गटात तिसऱ्या स्थानावर आहे. दबंग दिल्लीचा संघ अ गटात अजुनही तळाच्या स्थानावर असल्याने या स्पर्धेत पुनरागमन करणं अत्यंत कठीण होऊन बसलं आहे.