कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे. देशभरात आणि नंतर सातासुमद्रापार कबड्डीला पोहचवण्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आणि संघटकांचा फार मोठा वाटा आहे. गेले काही हंगाम क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रो-कबड्डीने पुन्हा एकदा आपल्या मातीतल्या खेळाला ‘अच्छे दिन’ आणले आहेत. महाराष्ट्रातले मुंबई आणि पुणे असे दोन संघ या स्पर्धेत सहभागी झाले असले तरीही इतर संघात अनेक मराठी खेळाडूंचा भरणा आहे.

प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामात सध्या दबंग दिल्लीकडून खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या निलेश शिंदेने, पुणेरी पलटण विरुद्धच्या सामन्यात केलेल्या खेळीमुळे सध्या त्याची चांगलीच वाहवा होताना दिसत आहे. पुणेरी पलटणच्या संदीप नरवालला गनिमी काव्याने डॅश करत मैदानाबाहेर केलेल्या व्हिडीओला सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

पाचव्या पर्वात पुणेली पलटण विरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्रात दबंग दिल्लीचा संघ काहीसा पिछाडीवर होता. मात्र आनंद पाटील आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीमुळे दिल्लीने पुण्याच्या संघाला चांगली लढत दिली. या सामन्यादरम्यान पुण्याच्या संदीप नरवालला रेडींगदरम्यान एका बेसावथ क्षणी डॅश करत मैदानाबाहेर केलं. संदीप नरवालला रेडींगदरम्यान पॉईंट घेता आला नाही, त्यामुळे तो आपल्या कोर्टमध्ये परतताना दिल्लीच्या बचावपटूंकडे पाठ करत मागे परतत होता. मात्र निलेश शिंदेने यावेळी आपला गनिमी कावा साधला आणि संदीप नरवालला मैदानाबाहेर केलं.

सलग दुसऱ्या सामन्यात दबंद दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला, तरीही दिल्लीने पराभवातून एका गुणाची कमाई केली आहे. आज दबंग दिल्लीचा सामना यू मुम्बासोबत होणार आहे. त्यामुळे या सामन्यात निलेश शिंदे आणि टीम कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.