प्रो-कबड्डीत आंतर झोन वाईल्ड कार्ड सामन्यात बंगळुरु बुल्सने दबंग दिल्लीवर मात केली आहे. ३५-३२ अशा फरकाने विजय मिळवत बंगळुरुने दिल्लीची झुंज मोडीत काढली. बंगळुरुच्या संघाने केलेली अष्टपैलू कामगिरी हे त्यांच्या विजयाचं प्रमुख कारण ठरलं.

सामन्यात सुरुवातीच्या सत्रापासून बंगळुरु बुल्सने आपलं वर्चस्व कायम ठेवलं. यात प्रामुख्याने महत्वाची भूमिका बजावली ती कर्णधार रोहित कुमार आणि अजय कुमारने. रोहितने सामन्यात चढाईत १२ गुणांची कमाई केली, त्याला अजय कुमारने १० गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. या दोन्ही खेळाडूंनी दिल्लीची बचावफळी कमकुवत करण्यात महत्वाची भूमिका बजावली. या दोन्ही खेळाडूंना महेंदर सिंह आणि रविंदर पेहलने बचावात ७ गुण मिळवत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला.

काल जयपूरविरुद्ध झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीने अखेरच्या क्षणात विजय मिळवला होता. मात्र आज बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात ही किमया करणं त्यांना जमलं नाही. पहिल्या सत्रात बचावफळीतील एकाही खेळाडूला बंगळुरुच्या चढाईपटूंवर अंकुश लावणं जमलं नाही. ज्याचा ताण दिल्लीच्या चढाईपटूंवर आलेला पहायला मिळाला.

दिल्लीकडून रोहित बालियानने चढाईत सर्वाधीक ११ गुणांची कमाई केली. त्याला दुसऱ्या सत्रात आर. श्रीरामने ५ आणि मिराज शेखने २ गुणांची कमाई करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र बचावफळीतील खेळाडूंनी केलेल्या निराशाजनक खेळामुळे दबंग दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सत्रात स्वप्निल शिंदे आणि सतपालने बचावफळीत बंगळुरुवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांनाही अपयश आलं.