कर्णधार मिराज शेख आणि बदली खेळाडू अबुफजल मग्शदुलूने दुसऱ्या सत्रात केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर दबंग दिल्लीने तामिळ थलायवाजवर ३०-२९ अशी मात केली. सुरुवातीची काही मिनीटं दोन्ही संघ सामन्यात बरोबरीत चालत होते. पहिल्या सत्राच्या अखेरीस सामन्यात १२-१२ अशी बरोबरी साधली गेली होती.

मात्र दुसऱ्या सत्रात तामिळ थलायवाजच्या अजय ठाकूरने दिल्लीच्या बचावफळीत खिंडार पाडत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. या सत्रामध्ये दबंग दिल्लीच्या चढाई आणि बचावपटूंनी निराशाजनक खेळ केला. यामुळे हताश झालेल्या दिल्लीच्या प्रशिक्षकांनी संपूर्ण संघ बदलत बदली खेळाडूंना संघात जागा दिल्ली. दिल्लीचे प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडीगिरी यांनी आजमावलेला हा फॉर्म्युला दिल्लाला तारुन गेला. ईराणचा उंचपुरा खेळाडू अबुफजलने दुसऱ्या सत्रात चढाईमध्ये ११ गुण मिळवले. पिछाडीवर पडलेल्या दबंग दिल्लीच्या संघाला सामन्यात आघाडी मिळवून देण्यात अबुफजलने मदत केली. यानंतर कर्णधार मिराज शेखने केलेल्या सुपर रेडच्या जोरावर तामिळचा संघ सामन्यात ऑलआऊट झाला. अखेरच्या काही सेकंदात अजय ठाकूरने एका खेळाडूला बाद करत बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पंचांनी हा गुण नाकारल्याने तामिळ थलायवाजला आपला पराभव मान्य करावा लागला.

अवश्य वाचा – कर्णधाराचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडतोय!

तामिळ थलायवाजकडून अजय ठाकूरने १४ गुणांची कमाई केली. तामिळकडून एकाही खेळाडूने अजयला साथ देण्याचा प्रयत्न केला नाही. कालच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा प्रपंजन आजच्या सामन्यात केवळ १ गुण मिळवू शकला. बचावपटूंमध्येही अमित हुडाचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे एका क्षणी पिछाडीवर असलेल्या दबंग दिल्लीने सामन्यात पुनरागमन करत एका गुणाच्या फरकाने सामना आपल्या नावे केला.