आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळणाऱ्या पुणेरी पलटण संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातच्या संघाने पुण्यावर ४४-२० अशी मोठ्या फरकाने मात केली. या पराभवाचा पुण्याच्या प्ले-ऑफमधली स्थानावर कोणताही परिणाम होणार नाहीये. बचावफळीची निराशाजनक कामगिरी हे आजच्या पुण्याच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरली

गुजरात आणि पुणे यांच्यातला सामना हा अटीतटीचा होईल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्ष सामन्यात असं काहीही होताना आढळलं नाही. गुजरातने पुण्यावर एकतर्फी मात केली. सुरेश कुमार आणि राजेश मोंडलचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला सामन्यात गुण मिळवता आले नाही. कर्णधार दिपक हुडाच्या गुणांची पाटीही आजच्या सामन्यात कोरीच राहिली. त्यामुळे गुजरातवर दबाव टाकण्यात पुण्याचा संघ अपयशी ठरला.

चढाईपटूंप्रमाणेच पुण्याच्या बचावपटूंनीही आजच्या सामन्यात निराशा केली. बांगलादेशच्या झिऊर रेहमानचा अपवाद वगळता एकाही बचावपटूला सामन्यात गुण कमावता आले नाहीत. अष्टपैलू संदीप नरवाल, उजवा कोपरारक्षक गिरीश एर्नेक, अनुभवी धर्मराज चेरलाथन यांना सामन्यात एकही गुण कमावता आला नाही. ज्यामुळे गुजरातच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्याचं काम पुण्याला करता आलं नाही.

दुसऱ्या बाजूला गुजरातच्या संघाने आपला विजयी फॉर्म कायम राखत अष्टपैलू खेळ केला. कर्णधार सुकेश हेगडेने आपल्या पदाला साजेसा खेळ करत सामन्यात चढाईत १५ गुणांची कमाई केली. त्याला सचिनने ४, रोहित गुलियाने ३ आणि चंद्रन रणजीतने २ गुण मिळवत चांगली साथ दिली. पुण्याच्या बचावफळीला नेस्तनाभूत करण्याचं काम गुजरातच्या चढाईपटूंनी केलं.

बचावफळीतल्या खेळाडूंनीही आज आपल्या संघातील सहकाऱ्यांना चांगली साथ दिली. सुनील कुमार, परवेश भैंसवाल, अबुझार मेघानी, फैजल अत्राचली यांनी आपापल्या पद्धतीने गुणांची कमाई करत पुण्याच्या सामन्यात पुनरागमनाचे सर्व दोन कापून टाकले. गुजरातचा संघ या स्पर्धेत प्ले-ऑफमध्ये याआधीच दाखल झाला असून या विजयानंतर अ गटातलं आपलं पहिलं स्थान कायम राखण्यात गुजरातला यश आलंय.