तराजूची दोलायमान होणारी पारडी आपण प्रत्येकाने अनेकदा पाहिली असतील. ती एकसारखी आणायची असल्यास दोन्ही पारड्यांमध्ये समान वजन टाकणं आवश्यक असतं. प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातला आजचा गुजरात विरुद्ध हरियाणाचा सामना अशाच तराजूची आठवण करुन देत होता. अतिशय चुरशीच्या झालेला सामना अखेर २७-२७ अशा बरोबरीत सुटला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – तेलगू टायटन्सच्या पराभवाचा ‘चौकार’

सामन्याच्या सुरुवातीपासून स्कोअरलाईनवर दोन्ही संघ बरोबरीत चालत होते. हरियाणा स्टिलर्सच्या खेळाडूंनी सामन्याची सुरुवात आक्रमकतेने केली. त्याला गुजरात फॉर्च्युनजाएंट्सच्या संघानेही तितकच जोरदार प्रत्युत्तर दिलं. गुजरातच्या सचिनने एकाच रेडमध्ये २ पॉईंट घेत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या रेडमुळे गुजराच्या संघाकडे सुरुवातीच्या क्षणाला ३-० अशी आघाडी होती. मात्र हरियाणाच्या संघाने जोरदार मुसंडी मारत सामन्यात ७-७ अशी बरोबरी साधली. हा सामना इतका चुरशीचा झाला की अखेरच्या ३ मिनीटांमध्येही सामन्याची स्कोअरलाईन ८-८ अशा बरोबरीत होती.

पहिल्या सत्रात गुजरातकडून सचिन आणि राकेश नरवाल या खेळाडूंचा अपवाद वगळला तर कर्णधार सुकेश हेगडेला एकही पॉईंट मिळवता आला नाही. मात्र हरियाणाचा कर्णधार सुरिंदर नाडाने डिफेन्समध्ये चांगली कामगिरी करत आपल्या संघाला पॉईंट मिळवून दिले. अखेर गुजरातकडून सुनील कुमारने डिफेन्समध्ये ३ पॉईंट मिळवत आपल्या संघाला सामन्यात निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्याला राकेश नरवालने रेडींगमध्ये चांगली साथ दिली. हरियाणाकडून डिफेन्समध्ये कर्णधार सुरिंदर नाडाला उजवा कोपरारक्षक मोहीत छिल्लरकडून चांगली साथ मिळाली नाही, त्यामुळे पहिल्या सत्रात गुजरातने हरियाणावर ११-८ अशी ३ गुणांची आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात हरियाणाच्या संघाला ऑलआऊट करण्याच्या अनेक संधी गुजरातच्या संघाकडे चालून आल्या होत्या. मात्र त्यांचा वापर करायला गुजरातचा संघ कमी पडला. हरियाणाने गुजरातला पुन्हा एकदा टक्कर देत सामन्यात ११-११ अशी बरोबरी साधली. कर्णधार सुरिंदर नाडाने याच सत्रात आपले डिफेन्समधले ५ पॉईंट पूर्ण केले. यानंतर मात्र सुरिंदर नाडाने केलेल्या एका चुकीचा फायदा घेत गुजरातने सामन्यात पुन्हा पुनरागमन केलं आणि हरियाणाच्या संघाला ऑलआऊट करुन सामन्यात २०-१३ अशी आघाडी घेतली.

यानंतर आणखी काही पॉईंट मिळवत गुजरातच्या संघाने ही आघाडी २२-१३ अशी केली, त्यामुळे गुजरातचा संघ सामना जिंकणार अशी परिस्थिती तयार झाली होती. मात्र हरियाणाच्या विकास कंडोलाने सामन्यात मॅरेथॉन रेड करत सामन्याचं पारडं पुन्हा एकदा हरियाणाच्या संघाकडे झुकवलं. याच सत्रात हरियाणाने गुजरातच्या संघाला ऑलआऊट करुन सामन्यात २३-२३ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या सत्रात हरियाणाच्या सुरिंदर सिंहने रेडींगमध्ये ६ पॉईंट घेतले. यानंतर मग कोणत्याही खेळाडूने जास्तीची जोखीम न घेता सामना बरोबरीत सोडवण्यात धन्यता मानली.