प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात जे काम तेलगू टायटन्स आणि बंगळुरु बुल्स संघाला जमलं नाही ते नवोदीत गुजरातच्या संघाने करुन दाखवलेलं आहे. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना गुजरातच्या संघाने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. यू मुम्बा, दबंग दिल्ली पाठोपाठ आज जयपूर पिंक पँथर्सवरही आज गुजरातच्या संघाने मात केली. २७-२० अशा फरकाने गुजरातने आज जयपूरविरुद्धचा सामना आपल्या खिशात घातला आहे.

सलग ३ सामने जिंकल्यानंतर गुजरातच्या संघाचा आत्मविश्वास हा दुणावलेला होता. त्यामुळे जयपूरविरुद्धच्या सामन्यात गुजरातच्या खेळाडूंनी आक्रमक शैलीत सामन्याची सुरुवात केली. मात्र जयपूरच्या खेळाडूंनीही त्याला तितकचं चांगलं प्रत्युत्तर दिलं. मात्र गुजरातकडून आजच्या सामन्यात सचिनने पुन्हा एकदा धडाकेबाज खेळ करत सामन्यात ७ पॉईंट मिळवले. त्याला रोहीत गुलियाने २ पॉईंट मिळवत चांगली साथ दिली. गुजरातच्या बचावपटूंनीही आपल्या चढाईपटूंनी आजच्या सामन्यात तितकीच चांगली साथ दिली. गुजरातच्या संघात दोन्ही कोपरे सांभाळणारे फैजल अत्राचली आणि अबुझर मोहरममेघानी यांनी सामन्यात ८ गुण मिळवले. त्याला प्रवेश भैंसवालने ३ आणि सुनिल कुमारने १ गुण मिळवत चांगली साथ दिली.

जयपूरच्या सर्व खेळाडूंवर अंकुश ठेवण्यात गुजरातच्या खेळाडूंना यश आलं. जसविर सिंह, मनजीत छिल्लर आणि सर्व चढाईपटू आज सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. त्यात जयपूरचे बचावपटूही आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे गुजरातच्या संघासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणं आणखी सोप्प झालं.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – पाटणा पायरेट्सच्या विजयरथाला खिळ, यूपीविरुद्ध सामना बरोबरीत